गुटखा धंद्याकडे दुर्लक्ष करून कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इचलकरंजीतील पोलीस निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्यास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबुराव गायकवाड (वय ५२, रा. मणेरे अपार्टमेंट जवाहरनगर) आणि पोलीस नाईक विष्णू रमेश िशदे (वय ४०, रा. केटकाळे गल्ली) अशी या दोघांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकण्याची इचलकरंजीतील पहिलीच घटना आहे. या प्रकाराने पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलीस रेकॉर्डवरील गुटखा व्यावसायिक राजू लक्ष्मण पाच्छापुरे (रा. जुना चंदूर रोड) यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार राजू पाच्छापुरे याने पासपोर्टसाठी अर्ज केलेला आहे. हा अर्ज पोलीस ठाण्यात आला आहे काय, याच्या चौकशीसाठी पाच्छापुरे हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी पाच्छापुरे याला तुझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. त्यामुळे पासपोर्ट संदर्भात अनुकूल अहवाल देता येणार नाही, असे सांगितले. त्याचबरोबर गुटखा धंद्याच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई न करण्याचे आणि धंद्याकडे दुर्लक्ष करतो त्यासाठी मासिक ७५ हजार रुपये हप्ता देण्याचे सांगत िशदे याला भेटण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पाच्छापुरे हा िशदे याला न भेटता निघून गेला होता. त्यानंतर िशदे याने पाच्छापुरे याची दोन-तीनवेळा भेट घेत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पसे केव्हा देतोस अशी विचारणा केली. त्यावर पाच्छापुरे याने मी एकदा गुटख्याचा धंदा करीत नसून अन्य गुटखा व्यापारी आहेत. त्यांना घेऊनच साहेबांना भेटतो असे सांगितले होते.

२० सप्टेंबर रोजी िशदे याने पाच्छापुरे याची भेट घेऊन गायकवाड यांना द्यावयाच्या पशांबाबत चर्चा केली. त्यावेळी २२ सप्टेंबर रोजी गायकवाड यांची पोलीस ठाण्यात भेट घालून देण्याचे सांगितले होते.

या संदर्भात पाच्छापुरे याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुरुवार, २२ रोजी पाच्छापुरे यांनी पंच साक्षीदारांसह शिवाजीनगर ठाण्यात पोलीस निरीक्षक गायकवाड यांची भेट घेतली. त्यावेळी िशदेही उपस्थित होता. त्यावेळी झालेल्या चच्रेत तडजोडीअंती मासिक ६० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते.

शुक्रवारी पाच्छापुरे याच्या जुना चंदूर रोड येथील घरात जाऊन िशदे हा ६० हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यावेळी िशदे याने सदरची रक्कम ही पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासाठी स्वीकारल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांनाही ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, श्रीमती पद्मा कदम, सहाय्यक फौजदार मनोहर खणगांवकर, पोहेकॉ श्रीधर सावंत, अमर भोसले, पोलीस नाईक मनोज खोत, संदीप पावलेकर, मोहन सौंदत्ती यांच्या पथकाने केली.