उदगाव-अंकली टोलनाक्यावर २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांच्यासहित ३८ जणांची जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्तता केली. खासदार शेट्टी यांच्यासहित ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१२ नोव्हेंबर २०१२ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना इंदापूर येथे अटक करण्यात आली होती. या वेळी उदगाव येथील टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर-सांगली महामार्ग रोखून चक्का जाम आंदोलन केले होते. या वेळी टोलनाक्याची तोडफोड करून रास्ता रोको केल्याप्रकरणी खासदार शेट्टी यांच्यासहित ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खासदार राजू शेट्टी, सागर चिप्परगे, शैलेश चौगुले, सागर मादनाईक यांच्यासह ३८ जणांची जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग दंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी अ‍ॅड. राजू कागवाडे, अ‍ॅड. पी. डी. मगदूम, अ‍ॅड. पी. ए. आणुजे, अ‍ॅड. एस. टी. चौगुले, अ‍ॅड. सचिन चौगुले यांनी याबाबत काम पाहिले. तसेच जयसिंगपूर बार असोसिएशनचे सहकार्य लाभले.