शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत विरोधी पक्षाची संघर्ष यात्रा दुसऱ्या टप्प्यात शेती क्षेत्रात तुलनेने सधन असलेल्या कोल्हापुरात मंगळवारी येत आहे. शासनाविरुद्ध संघर्ष यात्रा काढत विरोधकांनी ऐक्य साधल्याचा दावा केला असला तरी जिल्हापातळीवर मात्र संघर्ष कायम आहे. स्थानिक पातळीवरील संघर्षांचे उच्चाटन करणे हेच मुद्दलात संघर्ष यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आव्हान असणार आहे.

केंद्र व राज्यामध्ये सत्तापालट झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात आली. नव्या शासनाला जनतेचे प्रश्न सोडवता येत नाही, अशी हाकाटी पिटत विरोधकांनी गेल्या दीड-दोन वर्षांपासून आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका यांच्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपने सर्वाधिक जागा मिळवतानाच स्थानिक पातळीवरील सर्वाधिक सत्तास्थानेही काबीज केली आहेत.

यामुळे यापुढे कोणता मुद्दा घेऊन लोकांपुढे जावे असा प्रश्न विरोधकांना पडला असताना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निमित्ताने कर्जमाफीच्या विषयाने उचल खाल्ली. उत्तर प्रदेशप्रमाणेच राज्यातही कृषी कर्जे माफी द्यावी या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी, डावे, जनता दल, समाजवादी, शेकाप असे सगळेच पक्ष संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राज्य िपजून काढत आहेत. याच वेळी सर्व शेतकरी संघटनांनी कर्जमुक्तीच्या प्रश्नावर आंदोलनाचा रेटा वाढवण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या संघर्ष यात्रेचे दुसरे सत्र पश्चिम महाराष्ट्रात सुरू होत आहे. मंगळवारी ही संघर्ष यात्रा कृषी क्षेत्रात दबदबा असलेल्या सुजलाम सुफलाम कोल्हापूर जिल्हय़ात येत आहे. यानिमित्ताने जिल्हय़ातील राजकीय क्षेत्रात वेगळाच मुद्दा पुढे येत आहे. सरकारविरुद्ध संघर्ष पुकारणाऱ्या विरोधकात ऐक्य किती हा मुद्दा चच्रेला आला आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये गटबाजी खोलवर रुजली आहे. पक्षातच ऐक्य नसलेले स्थानिक नेते सत्ताधाऱ्यांच्या प्रभावी आक्रमणासमोर टिकणार कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेसची गटबाजी कायम

कोल्हापूर जिल्हय़ाच्या काँग्रेसमध्ये गटबाजीचा रोग जुना आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमानिमित्ताने गटबाजी उफाळून आली. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री जयंवतराव आवळे आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात संघर्षांचे नवे आवर्तन घडले. भोगावती कारखान्याच्या निमित्ताने पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील हे एकमेकांसमोर ठाकले आहेत. तर माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र राहुल देसाई हे पक्षांतर्गत मतभेदांमुळे भाजपच्या वाटेवर आहेत. या साऱ्या घटना पक्षातील नेत्यांमधील ‘सद्भावने’चे दर्शन घडवणाऱ्या आहेत.

मुश्रीफ-महाडिक संघर्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हय़ाचे सर्वेसर्वो आमदार हसन मुश्रीफ आणि पक्षातील दुसरे प्रभावी नेते खासदार धनंजय महाडिक यांच्यातही जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने संघर्षांची आणखी एक ठिणगी पडली. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बठकीस दोघे एकत्र असले तरी त्यांच्यातील देहबोली मात्र वादाच्या खुणा दर्शवणारी होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी आदेश देऊनही माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी स्थानिक आघाडय़ा केल्याने मुश्रीफ यांच्या मनात किंतू आहे. या घटना पाहता राष्ट्रवादीअंतर्गत संघर्षांला तिलांजली कधी मिळणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहे. पक्षांतर्गत संघर्ष सोडवता न येणारे विरोधक राज्यपातळीवरील संघर्ष यात्रा काढून नेमके काय साध्य करणार, हा प्रश्न या निमित्ताने उद्भवत आहे.