नाटककार शफाअत खान यांची खंत; मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
मुसलमान या मातीतील असूनही त्यांच्याबाबत संशयी वातावरण निर्माण करण्यात येत आहे. त्यांच्यावर बळजबरीने परकेपणा लादला गेला आहे. त्यामुळे तो आतला असूनही परकेपणा अनुभवत आहे. हे परकेपण पोखरणारे असते. उद्या हेच पोखरले गेलेले उपरेपणाच्या गोष्टी सांगणार असून साहित्यात मोलाची भर घालतील, असे प्रतिपादन नाटककार शफाअत खान यांनी येथे व्यक्त केले. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून खान बोलत होते.
मुस्लिम बोर्डिग हाऊसतर्फे मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येथील केशवराव भोसले नाटय़गृहात मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य सोहळ्यात विचारवंत, लेखकांचा सहभाग आहे. संमेलनानिमित्त विविध विषयांवरील चर्चासत्रे, परिसंवाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. स्वागताध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी राजर्षी शाहू महाराज आणि मुस्लिम समाज यांच्यातील अनुबंध उलगडून दाखवले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी संमेलनाला पाच लाखांची देणगी दिली. आबालाल रहेमान कलादालनाचे उद्घाटन खासदार संजय काकडे यांच्या हस्ते झाले. माजी आमदार पाशा पटेल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले .
तंत्रज्ञानाने झालेल्या बदलांविषयी भाष्य करताना शफाअत खान म्हणाले की, भाषा, संस्कृती, वेगळ्या ओळखी पुसल्या जात आहेत. धर्म ही एकमेव ओळख ठसठशीत करून दहशतवाद पसरवला जात आहे. असहिष्णू असणे गौरवास्पद ठरवले जात आहे. जगण्याचा ताबा बाजारी जगाने घेतला असल्याने त्याद्वारे माणसांना आनंदाचे झटके येत आहेत. मुस्लिम साहित्य परिषदेने लेखक घडवण्याची जबाबदारी घेऊन कार्यशाळा आयोजित करण्याचा सल्ला दिला.

दोन तासांचा विलंब
साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम दोन तास उशिरा सुरु झाला . शिवाय वक्त्यांनी साहित्येतर विषयांवर मांडणी केल्याने रटाळपणा आला होता. पण या लांबलेल्या कार्यक्रमात ऊर्जा आणली ती संमेलनाध्यक्ष शफाअत खान यांनी. संमेलनाध्यक्ष पदाचे लिखित भाषण वाचून दाखवताना काही नवे मुद्दे , विचार पेरत श्रोत्यांना चिंतन करण्यास भाग पाडले . हे एकमेव भाषण रंगत असताना सर्व राजकीय नेते मंचावरून निघून गेले होते. यानिमित्त स्मरणिका प्रकाशित केली असली तरी त्याचे संयोजक, प्रकाशक, मुद्रक कोण याचा उल्लेख मात्र नाही.

भाषा, संस्कृती, वेगळ्या ओळखी पुसल्या जात आहेत. धर्म ही एकमेव ओळख ठसठशीत करून दहशतवाद पसरवला जात आहे. असहिष्णू असणे गौरवास्पद ठरवले जात आहे. जगण्याचा ताबा बाजारी जगाने घेतला असल्याने त्याद्वारे माणसांना आनंदाचे झटके येत आहेत.
– शफाअत खान