‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसात दोन भूमिका घेतल्यावर येथील पुरोगामी विचाराच्या ज्येष्ठ नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मराठा समाजाची मतपेढी खुणावू लागल्याने त्यांनी अशी भूमिका घेतली असल्याची टीकाही या नेत्यांनी केली आहे.

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मराठा समाजाचे मोठे मोच्रे निघाले. त्याला मिळालेला अपूर्व प्रतिसाद पाहून पवार यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यात बदल करण्याची मागणी केली. याला विरोध होऊ लागताच लगेचच आपल्या भूमिकेत बदल करत त्यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या या बदलत्या भूमिकेने महाराष्ट्रातील पुरोगामी कार्यकत्रेही गोंधळात पडले आहेत.

पुरोगामी विचाराने वाटचाल करणाऱ्या पवारांना सत्तेबाहेर राहिल्याने विशिष्ट समाजाला खूश करणारी भूमिका घ्यावी लागली असावी, अशी टीका करून आरपीआयचे नेते शहाजी कांबळे म्हणाले, की पवारांनी दलितांवरील अत्याचार, बलात्कार याची अचूक आकडेवारी घेऊन बोलावे. कोपर्डी घटनेवरून अनुमान काढणे त्यांना शोभादायक नाही.

सुशीलकुमारांचे मौन

सोलापूर : उपेक्षित दलित समाजावर अन्याय होऊ नये म्हणून अस्तित्वात असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करण्याची गरज भासत नाही, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याविषयी व्यक्त केलेल्या मताच्या संदर्भात शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.