यंत्रमाग कारखाना उभारण्यासाठी घेतलेल्या २० लाख रुपयांच्या मोबदल्यात जादा रकमेच्या वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी व बेकायदा सावकारकी केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील अमन सहकारी बँकेचे संस्थापक, सावकारीतील बडे प्रस्थ बादशहा बागवान याच्यासह दोघांवर आज शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार लतिफ मेहबुब मुल्ला (रा. तारदाळ) यांनी दिली आहे. दरम्यान, बागवान यांच्या यड्राव येथील घरावरही पोलिसांनी छापा टाकला. घराची झडती घेण्यात आली. माजी नगरसेवक बागवान हे राजकीय वलयांकित असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.
तारदाळ येथील लतिफ मुल्ला हे यंत्रमाग कारखानदार आहेत. कारखाना उभारणीसाठी २०१४ साली त्यांनी बादशहा बागवान यांच्याकडून २० लाख रुपये घेतले होते. याबदल्यात त्यांनी जागेची कागदपत्रे तारण ठेवली होती. बागवान यांनी २० लाख रुपये देताना त्यातीलच १ लाख ७० हजार रुपये पहिला हप्ता कपात केला होता. मुल्ला यांनी यानंतर दुसऱ्या बँकेतील कर्ज काढून पहिल्यांदा ११ लाख व त्यानंतर ९ लाख असे २० लाख रुपयांची परतफेड केली होती. तसेच महिन्याला ७० हजार रुपये याप्रमाणे ४ लाख ९० हजार रुपये व्याजापोटी दिले होते. २० लाखापोटी २६ लाख ६० हजार परतफेड करूनही बागवान व त्याचा दिवाणजी शफीक (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणखी १० लाखांसाठी तगादा लावत होता.
या रकमेच्या वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी या दोघांनी दिल्याची तक्रार मुल्ला यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी बागवान व त्यांचा दिवाणजी शफीक यांच्यावर बेकायदा सावकारी, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान पोलिसांनी बादशहा बागवान यांच्या बंगल्यावर छापा टाकला. येथील घराची झडती घेतली. काही कागदपत्रांची तपासणी केली. त्याचबरोबर विकली मार्केट परिसरातील अमन नागरी सहकारी पतसंस्थेतही व्यवहाराची पोलिसांनी माहिती घेतली. बागवान हे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोवा या भागातील सावकारीतील बडी असामी म्हणून ओळखली जाते. काही कोटी रुपयेही रातोरात देण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याने राजकारणी, उद्योजक, व्यापारी त्यांचे उंबरठे झिजवत असतात. एकेकाळी चित्रपटगृहाबाहेर तिकिटे विकणारा बागवान सावकारीतील बादशहा बनला असल्याने त्याच्यावरील कारवाईबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. स्थानिक माकपच्या राजकारणात बागवान यांचा निकटचा संबंध असून त्यांच्या बँकेत पक्षाचे काही सदस्य संचालक आहेत.