महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता फेरीत भारतीय महिला संघाने थायलंडच्या संघावर ९ विकेट्सने दणदणीत विजय साजरा केला. संपूर्ण सामन्यात मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी थायलंडला अवघ्या ५५ धावांमध्ये गुंडाळले आणि हे कमकुवत आव्हान भारताने १३ षटकांच्या आतच गाठले. भारतीय महिला संघाने पात्रता फेरीत दमदार कामगिरी दाखवून आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यात भारताची वेगवान गोलंदाज मानसी जोशी हिने ८ व्या षटकात थायलंडच्या फलंदाजाची घेतलेली विकेट सामन्याचे विशेष आकर्षण ठरली. मानसीने थायलंडची कर्णधार सोरनारिन टिपोच हिला क्लीनबोल्ड करून भारताला मोठे यश मिळवून दिले. २३ वर्षीय मानसीने अप्रतिम इन स्विंग टाकून टिपोच हिची विकेट घेतली. तिने आपल्या स्पेलमध्ये एकूण २९ निर्धाव चेंडू टाकले, तर तिला एकच चौकार ठोकला गेला. मानसीने घेतलेल्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून मानसीच्या गोलंदाजीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2017 रोजी प्रकाशित
VIDEO: मानसी जोशीचा भन्नाट स्विंग, थायलंडची फलंदाज क्लीनबोल्ड
भारतीय गोलंदाजांनी थायलंडला अवघ्या ५५ धावांमध्ये गुंडाळले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-02-2017 at 11:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A brilliant ball from india mansi joshi clean bowls