ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० अशी धूळ चारल्यावर भारतीय संघाचे मनोबल कमालीचे उंचावले आहे. पण आगामी स्पर्धासाठी मात्र निवड समितीपुढे पेच निर्माण झाला आहे. आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची संघनिवड शुक्रवारी करण्यात येणार आहे. या वेळी अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे या फलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. एकदिवसीय मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे अजिंक्यला ट्वेन्टी-२० मालिकेला मुकावे लागले होते. दुसरीकडे मनीषने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आगामी दोन्ही महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न निवड समितीपुढे असेल.

सेतूरमनचा धक्कादायक विजय
पीटीआय, जिब्राल्टर
ग्रँडमास्टर एस. पी. सेतूरमनने पोलंडचा ग्रँडमास्टर रॅडोस्लॅव्ह वोय्ताशेकचा पराभव करून जिब्राल्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पध्रेत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. माजी राष्ट्रीय विजेत्या सेतूरमनने नवव्या फेरीतील सामन्यात आपल्या खेळाने वोय्ताशेकला अचंबित केले. सेतूरमनने ३७ चालींतच हा विजय मिळवत ७ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली.
त्याच्यासह अव्वल मानांकित हिकारू नाकामुरा (अमेरिका), पी. हरिकृष्णा (भारत), एटीन्ने बॅक्रोट (फ्रान्स), सेबॅस्टियन मेझ (फ्रान्स), मेक्सिमे व्हॅचिएर-लॅग्रेव्ह (फ्रान्स), ली चाओ बी (चीन) आणि डेव्हिड अँटोन गुजारो (स्पेन) संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत.