भारताच्या विश्वनाथन आनंदला झुरिच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. अर्मागेडन डावात त्याला अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने पराभूत केले. या दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी नऊ गुण झाल्यानंतर या डावाचा उपयोग करण्यात आला.
या स्पर्धेत व्लादिमीर क्रामनिकला तिसरे स्थान मिळाले. त्याने साडेआठ गुणांची कमाई केली. लिव्हॉन अरोनियनने सहा गुणांसह चौथा क्रमांक मिळवला. सर्जी कर्जाकिनने पाचवे स्थान घेताना सहा गुण मिळविले. इटलीच्या फॅबिआनो कारुआनाने साडेपाच गुणांसह सहावे स्थान पटकावले.
आनंदला पहिल्या फेरीत क्रामनिकविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. दुसऱ्या फेरीत त्याला अरोनियनने पराभवाचा धक्का दिला. तथापि, तिसऱ्या फेरीत आनंदने कारुआनाविरुद्ध शानदार विजय मिळवला. चौथ्या डावात पुन्हा आनंदला पराभवास सामोरे जावे लागले. त्याला नाकामुराने हरवले. शेवटच्या फेरीत आनंदने कर्जाकिनविरुद्ध बरोबरी स्वीकारली. आनंदने या स्पर्धेतील क्लासिक विभागात अव्वल स्थान घेतले होते, तसेच टायब्रेक गुणांमध्ये त्याने नाकामुराला मागे टाकले होते, परंतु संयोजकांनी ऐन वेळी अर्मागेडन डाव घेण्याचे ठरवले. त्यामध्ये नाकामुराने आनंदवर बाजी मारली.