मुक्काम पोस्ट: सेंट्रल बिल्डिंग
पुरस्कारांचे गौडबंगाल भाग -२
मी कित्ती-कित्ती थोर-थोर, माझे कर्तृत्व किती मोठं-मोठं यासाठी पुरस्काराचे इच्छुक, कोणत्या थराला जाऊ शकतील? अशाच एका संस्थेने सुवर्णजयंती महोत्सव समारंभात ज्या २५-५० जणांचा सत्कार केला, त्यात अस्मादिकांसह होते सिक्किमचे राज्यपाल, अस्मादिकांसह होते पुणे जिल्हाधिकारी असं आपल्या निवेदनात (तेही ठळक शब्दांत!) नमूद करत आहेत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी रमेश एन. वीपट!
धन्य असो, महाराष्ट्राचे क्रीडा खाते. धन्य असोत क्रीडा आयुक्त माननीय राजारामजी माने आणि त्यांचे नोकरशाहीतील उजवे-डावे हात नरेंद्र सोपल व बेंच प्रेसमधील ‘या सम हेच’ लौकिकाचे माणिक ठोसरे, धन्य धन्य असोत, क्रीडामंत्री माननीय विनोदजी तावडे.
क्रीडा क्षेत्रातील या सर्वोच्च पुरस्कारासाठी रमेश एन. वीपट यांनी आपल्या लेटरहेडवरील निवेदनात, ‘क्रीडा-संघटकाच्या नात्याने कामगिरी’ (अचीव्हमेंटस् अ‍ॅज स्पोर्ट्स ऑर्गनायझर) या सदराखाली, मोठय़ा अभिमानाने आपणच आपली पाठ थोपटून घेण्याच्या अभिनिवेशात नमूद केलंय की,
१. गेली ४५ वर्षे, पुणे जिल्हा आंतरकचेरी संघटनेत सदस्य, चिटणीस, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आदी नात्यांनी सक्रिय. ही संघटना विविध १८ खेळांच्या स्पर्धा भरवीत आलेली आहे.
२. डिसेंबर २०१३मध्ये संघटनेने सुवर्णजयंती साजरी केली. या उत्सवात संस्थेचे (सारे) माजी अध्यक्ष, चिटणीस, पदाधिकारी यांचा सत्कार केला गेला.
आता विपट यांच्या आंतरकचेरी कामकाजातील कर्तृत्वाचा तिसरा मुद्दा, त्यांना विशेष महत्त्वाचा वाटतो. कारण तेवढाच मुद्दा ठळक शब्दांत दिलेला. तो असा-
३. विशेष म्हणजे (नोटेबली), सिक्किमचे राज्यपाल अन् १९८७-८९ दरम्यानचे पुणे जिल्हाधिकारी यांचाही सत्कार केला गेला.
आता वीपट यांचा पुरस्कार कायम राहिला, अन् एकाच समारंभात आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या दोन्हीही दर्जेदार शर्यतींत पदक पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय जलतरणपटू वीरधवल खाडेसह अस्मादिकही गौरवित झाले, असे वीपट म्हणू शकतील. एका समारंभात अनेकांचे सत्कार होत असतात, तेव्हा अनेकांचा परस्परांशी संबंध नसतो. त्यांची कार्यक्षेत्रे व त्यांचे कर्तृत्व भिन्न, वेगवेगळं असू शकतं. अशा वेळी बडय़ा लोकांशी तेवढय़ावरून संबंध जोडू पाहाणं, ही केवढी लाचारी, केवढा न्यूनगंड! मुद्दा असा की, कार्यच थिटे, किरकोळ- म्हणून माहिती देताना हे पॅडिंग, ही तारांबळ!
लेटरहेडवर ते आपलं नाव ‘रमेश एन वीपट’ असे लपेटदार शैलीत नोंदवतात. जलतरणातील आपल्या महतीचं वर्णन करताना, सरिता किनरे या छत्रपती पुरस्कार विजेतीचा उल्लेख करतात. आपला एक शिष्य अमोल मराठे हा पुढे प्रशिक्षक बनला आणि २००७-०८मध्ये दादोजी कोंडदेव पुरस्काराचा मानकरी बनला, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे त्याच्या यशाचे श्रेय लाटू पाहतात. या दोघांखेरीज आणखी सात-सात जलतरणपटूंचा उल्लेख करतात. राष्ट्रीय जलतरण शर्यतीत १४ वर्षे भाग घेतल्यानंतरही स्वत: कोणतेही पदक मिळवू न शकलेले वीपट, स्वत:चा उल्लेख ‘चांगला जलतरणपटू’ असा खुशाल करू शकतात!
एसएससी परीक्षेत वयाच्या १७व्या वर्षी १९६४मध्ये उत्तीर्ण झालेले वीपट, गेली किमान ४० वर्षे जलतरणात आहेत. या कालावधीत १५ हजार जलतरणपटू (अबब!) आपल्या हातांखालून गेले असा त्यांचा दावा आहे. असा हा हिरा शोधून काढलाय क्रीडामंत्री माननीय विनोदजी तावडे यांनी आणि आयुक्त माननीय राजाराम माने आणि त्यांचे उजवे-डावे हात, नरेंद्र सोपल व ‘बेंच प्रेस’ फेम माणिक ठोसरे यांनी. धन्य धन्य असो हे क्रीडा खाते.

पण यात काही गफलत तर होत नाहीए ना?
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार नियमावलीतील चौथा क्रमांक सांगतो की, .. ‘‘क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राने नाव देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्यात (ज्यांनी) संस्मरणीय अशी कामगिरी केली आहे, अशा व्यक्ती या पुरस्कारास पात्र राहतील.’’
जलतरणात महाराष्ट्र हा देशात सहसा अग्रेसर असतो. आशियाई व राष्ट्रकुल अशा दोन्हीही दर्जेदार शर्यतींतील एकमेव भारतीय पदक-विजेता वीरधवल खाडे हा कोल्हापूरचा. जुन्या काळातील लालू व श्रीचंद बजाज, रुस्तुम जहांगीर व रणजॉय पुंजा यांचाही देशात केवढा दबदबा!
त्यानंतरचा जमाना रेझा शिराझी, मोईन शिराझी, गौरव कपूर, विशाल कपूर आणि आता सेलीब्रेटी बनलेला मिलिंद सोमण यांचा. मग आले मंदार दिवसे, वीरधवल खाडे, रोहित हवालदार. महिला विभागात स्मिता देसाई-दिवगीकर व तिची शिष्या सोनाली रेगे. पदकांची डझनाने लयलूट करणारी अनिता सूद, कविता सूद, सोनल नानावटी आणि आजच्या जमान्यातील आरती घोरपडे, आदिती धुमटकर, आकांक्षा वोरा, अवंतिका चव्हाण, मोनिक गांधी.. राष्ट्रीय जलतरण व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील जलतरण शर्यतीत महाराष्ट्राचं नाव दुमदुमत ठेवणाऱ्या, गेल्या ५० वर्षांतील या काही प्रमुख खेळाडूंपैकी एकाशीही, पुन्हा सांगतो एकाही खेळाडूशी रमेश एन. वीपट यांचा दूरान्वयानेही संबंध नाही, मुळीच नाही!
यांना घडवणारे काही प्रमुख प्रशिक्षक म्हणजे, अकाली निधन पावलेले संदीप दिवगीकर. त्यांचा वारसा चालवणारे सुबोध डंखे, स्मिता दिवगीकर, आकांक्षा वोराचे गुरू योगेश कगात्रा, पुण्याचे विनय मराठे यांच्या आसपासही १५ हजार जलतरणपटू हातांखालून आरपार घालवणारे वीपट येऊ शकत नाहीत!
पण क्रीडामंत्री माननीय विनोदजी तावडे यांच्या कारकीर्दीतील नियमावली, राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराचे उद्दिष्ट शब्दबद्ध करताना, दुसऱ्याच नियमात सांगते.. ‘‘(ज्यांनी) महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनात अतुलनीय स्थान संपादले आहे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, क्रीडा कार्यकर्तृत्वाचा आणि एकूणच त्यांच्या कामाचा महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनावर संस्मरणीय प्रभाव पडला आहे, अशा क्रीडामहर्षीचा गौरव करणे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.’’ मग माननीय वीपट यांच्या कर्तृत्वाचा कोणता प्रभाव आम्हा पामरांच्या नजरेतून निसटला, पण माननीय विनोदजी तावडे यांच्या दिव्यदृष्टीने बरोबर टिपला? विनोदजी, आम्हा पामरांचे अज्ञान दूर करा!
वीपट यांचा कोणता प्रभाव पुण्याबाहेर, किंबहुना महाराष्ट्र क्रीडा खात्याच्या कचेरीबाहेर आणि पुणे जिल्हा आंतर-कचेरी संघटनेबाहेर पडला? रमेश एन. वीपट आपल्या लेटरहेडवरील निवेदनात, पुणे जिल्हा आंतरकचेरी संघटनेत गेली ४५ वर्षे सदस्य, चिटणीस, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष अशा विविध पदांवर सक्रिय होते, असे अभिमानाने नमूद करतात; पण असा हा खंदा कार्यकर्ता, महाराष्ट्र क्रीडा खात्यातील नोकरशाहीच्या गळ्यात ताईत असलेला असामी, कधीच पुणे जिल्हा व महाराष्ट्र संघटनेत

अधिकारपदी नव्हताच काय?
याबाबतचे रमेश एन. वीपट यांचं मौन बोलकं आहे, सूचक आहे! ही त्यांची नम्रता की काही अडचण?
१९८० ते ८५ दरम्यानच्या या कहाण्या म्हणा, किस्से म्हणा, तेव्हा पुणे जिल्हा जलतरण संघटनेत अधिकारपदी होते डॉ. अत्रे व अष्टपुत्रे. त्यांनी एका सहकाऱ्याला रंगेहाथ पकडलं. संस्थेचे म्हणे पाच-आठ-दहा हजार वा तत्सम रक्कम त्यानं उचलली, वापरली. तेव्हा अष्टपुत्रे फौजदारी खटला भरण्यास निघाले होते. मग त्या गुन्हेगाराने गयावया केली. मुंबईचे गांजावाला हे अष्टपुत्रेंचे दोस्त. त्यांनी मध्यस्थी केली. गुन्हेगाराने कबुलीजबाब दिला. यापुढे पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनांपासून दूर राहण्याचे लेखी आश्वासन दिले. ते आजपर्यंत बहुतांशी पाळले. दरम्यान त्या गुन्हेगारानं नवं कुरण हुडकून काढलं. दलाली सुरू केली. त्यात मान्यवरांची साथ, टक्केवारीच्या आधारावर मिळवली, आजपर्यंत टिकवून धरली, अगदी २०१५पर्यंत! क्रीडा खात्याच्या नोकरशाहीतील वरिष्ठांना याची माहिती (अर्थातच!) नसणार!

हे विषयांतर तर होत नसावे ना?
कोण असू शकेल तो तेव्हाचा गुन्हेगार आणि कबुलीजबाब दिल्यानंतर दलालीचे दुकान व्यवस्थित चालवणारा सज्जन? सज्जन? हो, त्याला सज्जनच म्हटलं पाहिजे, आजच्या जमान्यात.
हे किस्से सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वीचे. त्या काळातील डॉ. अत्रे, अष्टपुत्रे (तसेच आमदार डॉ. लेले) आज हयात नसावेत, हे आपले दुर्दैव व त्या सज्जनाचे सुदैव. तरीही त्या काळात तरुण असलेले खेळाडू आजही पुण्या-मुंबईत आहेत. जलतरणाची शान राखण्यासाठी ते पुढे येऊ शकतीलही, बोलके होऊ शकतीलही, कुणी सांगावं? पुन्हा वाटतंय, विषयांतर तर होत नाहीए ना? हे विषयांतर आहे, की पूर्णपणे विषयाला धरून आहे, हे आपण तूर्त सोपवू या माननीय विनोदजी तावडेंकडे. खेळाच्या भाषेत म्हणजे चेंडू आता त्यांच्या कोर्टात आहे!