दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर शांतपणे आणि धीराने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रसारमाध्यमांना सामोरा गेला. दक्षिण आफ्रिकेने ४३८ ही प्रचंड धावसंख्या उभी केली आणि भारताने पाचव्या सामन्यासह मालिका गमावली. ट्वेन्टी-२०पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही भारताने हार पत्करल्यामुळे ‘काय चुकले?’ हा प्रश्न विचारला जाणार, हे धोनीला अभिप्रेतच होते. याचप्रमाणे इतक्या वर्षांच्या नेतृत्वाच्या अनुभवामुळे प्रश्नांच्या ‘बाऊन्सर्स’ला कशा प्रकारे फटकवायचे, हे त्याला चांगलेच ज्ञात होते. भारतीय संघ संक्रमणातून जात आहे, ही एक प्रक्रिया आहे, संघात स्थर्याचा अभाव आहे, अशी तात्त्विक बैठकीतली उत्तरे देण्यात धोनी ‘माही’र आहे.

‘भारताचे काय चुकले?’ हा पहिला प्रश्न अपेक्षेप्रमाणेच धोनीला विचारला गेला. यावर धोनी म्हणाला, ‘‘सामन्यात काय चुकले, हा प्रश्न आज तरी विचारू नका. साडेचारशेच्या आसपास धावा प्रतिस्पर्धी संघाने केल्या आणि तरी तुम्ही विचारता की काय चुकले?’’ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका गमावल्यानंतर हाच धोनी म्हणाला होता की, ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात खेळताना बुद्धीचा फार वापर करण्याची आवश्यकता नसते.’’ कोणताही खेळ किंवा अगदी युद्धही बुद्धीच्याच बळावर जिंकता येते. मग एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक भारताला जिंकून देणारा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार धोनी असे का बरळत आहे. धोनीची कारकीर्द आता तशी सहा महिन्यांचीच शिल्लक आहे. भारतीय भूमीत होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकून समाधानाने अलविदा करण्याचा त्याचा इरादा आहे. परंतु सद्य:स्थितीतील भारताची कामगिरी पाहता धोनीला ते समाधान मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

वर्षभरात तसे पाहिल्यास धोनीच्या दृष्टीने काहीच अनुकूल घडलेले नाही. ऑस्ट्रेलियातील तिरंगी स्पध्रेपाठोपाठ भारताला विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयश आले. मग बांगलादेशमध्ये अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. पराभवाची ही मालिका भारताच्या भूमीवरसुद्धा कायम राहिली. या पराभवांतून धडा घेऊन एक स्थिर संघ मात्र अद्याप दिसू शकलेला नाही. याशिवाय धोनीचे स्वत:च्या फलंदाजीबाबतचे धोरणही ठाम नसल्याचे दिसून येत आहे. धोनी धावांसाठी झगडतो आहे, अशी टीका होताच त्याने स्वत:च्या फलंदाजीचे क्रमांक बदलण्याचे प्रयोग केले. त्याच्या खात्यावर धावा दिसल्या, परंतु त्या त्याच्या नावाला साजेशा मुळीच नव्हत्या. कठीण परिस्थितीतील सामना खात्रीने जिंकून देणारा ‘फिनिशर’ या नावलौकिकाला आता तो जागत नाही. त्यात चेन्नई सुपर किंग्जच्या काही मोहऱ्यांचे गुणगान गाण्याच्या आणि त्यांना संघात स्थान देण्याच्या धोनीच्या वृत्तीमुळे ‘काहीतरी चुकते आहे’ असे क्रिकेटरसिकांनाही वाटणे स्वाभाविक आहे.

कटकला भारताच्या पराभवाची लक्षणे दिसू लागताच क्रिकेटरसिकांनी बॉटलफेक करून सामन्यात व्यत्यय आणला. यावर भाष्य करताना धोनी म्हणाला की, ‘‘प्रेक्षकांनी गंमत म्हणून बाटल्या फेकल्या!’’ याशिवाय सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेचा क्रमांक त्याने कायम अस्थिर ठेवला आणि त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना धोनी म्हणाला, ‘‘रहाणेने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी, खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला अडचणी येतात.’’ ट्वेन्टी-२० मालिकेत भारतात आयपीएल खेळण्याचा कसून सराव असलेल्या जीन-पॉल डय़ुमिनीने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तीन सलग षटकार खेचले. त्या षटकात २२ धावा निघाल्यामुळे सामन्याचे चित्रच पालटले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची ‘अक्षरे’ उमटली. डय़ुमिनीसारखा डावखुरा फलंदाज मैदानावर असताना डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाकडे चेंडू देण्याचा धोनीचा निर्णय चुकला. पण सामन्यानंतर अक्षर कसा चुकला, याबद्दल धोनीने म्हटले की, ‘‘एखादा चेंडू सीमापार धाडल्यानंतर पुढील चेंडू तुम्ही कसा टाकता, हे महत्त्वाचे असते. सलग तीन चेंडूंवर चौकार किंवा षटकार कसे काय मारले जातात, की ज्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना बऱ्याच धावा सहज काढता येऊ शकतात.’’

वानखेडेवर क्विंटन डी कॉक, फॅफ डू प्लेसिस आणि ए बी डी’व्हिलियर्स या आफ्रिकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना २० षटकार आणि ३८ चौकारांची आतषबाजी केली. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय गोलंदाजीचे वास्तवच धोनीने रेखाटले. ‘‘आम्ही वेगाने चेंडू टाकू शकणारे अनेक वेगवान गोलंदाज वापरून पाहिले. पण ते बऱ्याच धावा देत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अचूक टप्पा आणि दिशा असणारे गोलंदाजच अधिक परवडतात. मोहित शर्माला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून वापरायला हवे. परंतु नवा चेंडू कुणी वापरायचा? शेवटच्या आणि मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी कुणी करायची? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. दुलीप करंडक, देवधर करंडक किंवा आयपीएलमध्ये छाप पाडणारे भारतीय गोलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यात अपयशी ठरतात,’’ असे धोनीने सांगितले. याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडूंची भारतात वानवा आहे. या परिस्थितीत स्टुअर्ट बिन्नी हा वेगवान गोलंदाजी करणारा, तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाजी करणारे सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत, हेसुद्धा धोनीने सांगितले.

संघ जिंकला की कधीच सांघिक कामगिरीचे शल्यविच्छेदन होत नाही. पराभवाचीच कारणे शोधली जातात. वर्षभर मर्यादित षटकांमध्ये हरणाऱ्या धोनीने केवळ ‘कारणे द्या’ याच प्रश्नांची उत्तरे दिली. परंतु त्यातून धडा घेऊन एक स्थिर संघ मात्र त्याला निर्माण करता आला नाही, हीच खरी चूक आहे.

– प्रशांत केणी
prashant.keni@expressindia.com