भारताच्या कबड्डी संघाने शनिवारी इराणसोबत झालेल्या अंतिम सामन्यात विजय प्राप्त करून कबड्डीच्या विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय संघाने कबड्डीचा विश्वचषक सलग तिसऱयांदा जिंकला. भारतीय कबड्डी संघाच्या या विजयाची संधी हेरून भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरून ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गन याला सुनावले.

पहिल्या ट्विटमध्ये सेहवागने भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले. अजय ठाकूरच्या खेळीचे कौतुक करत वीरुने आपल्या ट्विटमधून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. पण दुसऱया ट्विटमध्ये सेहवागने मॉर्गनवर निशाणा साधला. वीरु म्हणाला, भारताने कबड्डीला जन्म दिला आणि आठवेळा विश्वविजेता बनला, पण काही देश असे आहेत की ज्यांनी क्रिकेटला जन्म दिला मात्र ते दुसऱयांच्या चुका दुरूस्त करण्यात व्यस्त आहेत. वीरूने आपल्या हजरजबाबी ट्विटने मॉर्गनची नाचक्की केली.

कबड्डी विश्वचषक स्पर्धेत याआधी भारतीय संघाने इंग्लंडला मात दिल्यानंतर वीरेंद्र सेहवागने आपल्या खास शैलीत ट्विट केले होते. त्यात वीरूने इंग्लंडचा उल्लेख loose असा केला. खरंतर त्याला lose म्हणायचे होते. वीरूची ही चूक मॉर्गन याने लक्षात आणून दिली होती. मॉर्गनच्या या ट्विटनंतर ट्विटरकरांनी मॉर्गन यालाच फैलावर घेतले होते.

सेहवाग आणि मॉर्गन ट्विटरवर एकमेकांना भिडण्याची ही पहिलीच घटना नाही. रिओ ऑलिंम्पिकनंतर ऑलिम्पिक आणि भारताची कामगिरी या विषयांवर त्यावेळी जणू ट्विटर वॉर सुरु झाले होते. या टविटरवॉरमध्ये भारताची खिल्ली उडवण्यासाठी ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गनदेखील उतरला होता. क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने त्याला आपल्या खास शैलीत डिवचले होते. त्यामुळे दुखावलेल्या पिअर्सने वीरेंद्र सेहवागशी १० लाखांची पैज लावली होती. ‘इंग्लडने वनडे वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी भारताने ऑलिम्पिकमध्ये एकतरी सुवर्ण पदक जिंकून दाखवावे अन्यथा वीरेंद्र सेहवागने १० लाख रुपये दान करावे’ अशी पैज मॉर्गनेने लावली होती. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याने खुलेआम सेहवागला आव्हान दिले होते. पण हे ट्विट टाकल्यावर वीरेंद्र सेहवागने मॉर्गनची आपल्या शैलीत चांगलीच टर उडवली होती. त्यामुळे लगेच मॉर्गनने आपले ट्विट डिलिट करून नवीन ट्विट टाकले होते.