ऑस्ट्रेलिया म्हणजे विश्वचषकावर हुकमत गाजवणारा संघ. आतापर्यंत चार वेळा विश्वचषक पटकावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर अबाधित आहे. विश्वविजयाचे पंचक साधण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली सज्ज झाला असून मायदेशात ते विश्वविजयाला गवसणी घालणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
१९७५च्या विश्वचषकामध्ये इयान चॅपेल यांच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत मजल मारली होती. या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत त्यांनी रॉस एडवर्ड्ची ८० धावांची खेळी आणि डेनिस लिली k04यांच्या पाच विकेट्सच्या जोरावर पाकिस्तानला ७३ धावांनी पराभूत केले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी सलामीवीर अ‍ॅलन टर्नरच्या शतकाच्या जोरावर ३२८ धावांपर्यंत मजल मारली आणि ५२ धावांनी विजय मिळवला. पण तिसऱ्या सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजने सात धावांनी पराभूत केले असले तरी ते उपांत्य फेरीत पोहोचले. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत गॅरी गिल्मोरच्या सहा बळींच्या जोरावर इंग्लंडचा ९३ धावांत गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची ६ बाद ३९ अशी बिकट अवस्था होती, पण गिल्मोरनेच २८ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने कर्णधार क्लाइव्ह लॉइडच्या शतकाच्या जोरावर २९१ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २७४ धावांमध्ये संपुष्टात आला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. १९७९च्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्याकडून साखळी फेरीत पराभूत व्हावे लागले आणि त्यांना बाद फेरीत पोहोचता आले नाही. १९८३च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीत दोनदा वेस्ट इंडिजने पराभूत केले, तर भारत आणि झिम्बाब्वेनेही त्यांच्यावर मात केल्यामुळे बाद फेरीत पोहोचण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.
१९८७चा विश्वचिषक जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये क्रांती झाली. परदेशामध्ये जाऊन मोठी स्पर्धा जिंकू शकतो हे अ‍ॅलन बोर्डरच्या संघाने दाखवून दिले. या विश्वचषकाच्या पहिल्याच उत्कंठापूर्ण लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला अवघ्या एका धावेने पराभूत केले. पण त्यानंतर झिम्बाब्वे, न्यूझीलंड यांना पराभूत केल्यावर त्यांना भारताकडून पराभूत व्हावे लागले. पण त्यानंतर न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांना पुन्हा पराभूत करत त्यांनी सहजपणे उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना डेव्हिड बूनच्या ६५ धावांच्या खेळीच्या जोरावर त्यांनी २६७ धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला २४९ धावांमध्ये सर्वबाद केले ते वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडोरमॉटच्या पाच बळींच्या जोरावर. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरुद्धचा सामना चांगलाच रंगतदार झाला. अंतिम फेरीत पुन्हा एकदा बूनच्या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २५३ धावा फटकावल्या. या आव्हानाचा इंग्लंडचा संघ दमदारपणे पाठलाग करत होता. ग्रॅहम गूच आणि अर्धशतकवीर बिल अ‍ॅथे यांना बाद केल्यावर कर्णधार माइक गेटिंग आणि अ‍ॅलन लॅम्ब यांची जोडी इंग्लंडला विजयाकडे नेत होती. त्या वेळी कर्णधार बोर्डर यांनी स्वत:हून गोलंदाजीचा निर्णय घेत गेटिंगला पहिल्याच षटकात बाद करत ही जोडी फोडली आणि ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदाकडे कूच केली. त्यानंतर लॅम्बचा अडसर स्टीव्ह वॉ याने दूर केला. हे दोघे बाद झाल्यावर इंग्लंडकडून प्रतिकार झाला नाही आणि ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
१९९२च्या विश्वचषकाचे ऑस्ट्रेलियाकडे यजमानपद होते, पण त्यांना उपांत्य फेरीतही स्थान पटकावता आले नाही. १९९६च्या विश्वचषकात त्यांनी अंतिम फेरीत मजल मारली खरी, पण श्रीलंकेने त्यांच्यावर सहज विजय मिळवल्यामुळे त्यांना उपविजेतेपद मिळाले. १९९९च्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडने पराभूत केले होते. पण त्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिजवर मात करत ‘सुपर सिक्स’ फेरी गाठली आणि तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना चांगलाच गाजला. लान्स क्लुसनर जबरदस्त फॉर्मात होता. त्याने दोन चौकार लगावले आणि दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती. पण एकेरी धाव घेण्याच्या नादात अ‍ॅलन डोनाल्डने आपली विकेट गमावली, सामना बरोबरीत सुटला, मग सुपर सिक्समध्ये दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगली धावगती असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. अंतिम फेरीत शेन वॉर्नच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा चुराडा केला. वॉर्नने चार बळी मिळवत पाकिस्तानला १३२ धावांमध्ये रोखले आणि ऑस्ट्रेलियाने हे आव्हान आठ विकेट्स राखत सहज पूर्ण केले.
२००३च्या विश्वचषकापूर्वी वॉर्न वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे ऑस्ट्रेलियाला धक्का बसला, पण रिकी पाँटिंगचा संघ डगमगला नाही. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानविरुद्ध ५ बाद १४६ अशी अवस्था होती, पण त्यानंतर अँड्रय़ू सायमंड्सने १४३ धावांची धुवाँधार खेळी साकारत संघाला ३१० धावांपर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला २२८ धावांत गुंडाळत ८२ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग चार विजय नोंदवत ‘सुपर सिक्स’मध्ये स्थान मिळवले. या फेरीत त्यांनी श्रीलंका, न्यूझीलंड आणि केनियावर मात करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा सायमंड्सने त्यांना तारले आणि ९१ धावांची खेळी साकारल्यामुळे ऑस्ट्रेलियाला २१२ धावांपर्यंत मजल मारून दिली. डकवर्थ-लुइस नियमांनुसार पावसामुळे सामना थांबला तेव्हा श्रीलंकेची ७ बाद १२३ अशी अवस्था असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. अंतिम फेरीत भारतासमोर खेळताना पाँटिंगच्या नाबाद १४० धावांच्या अफलातून खेळीच्या जोरावर त्यांनी ३५९ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २३४ धावांमध्ये आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले.
२००७च्या विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाने विजयी घोडदौड सुरूच ठेवली. साखळी सामन्यांमध्ये त्यांनी तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत ‘सुपर-एट’मध्ये स्थान पटकावले. या फेरीत त्यांनी सातही सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेला १४९ धावांमध्ये गुंडाळत सात विकेट्स राखून हा सामना जिंकला. अंतिम फेरीत स्पर्धेत फॉर्मात नसलेल्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने नेत्रदीपक शतक लगावल्यामुळे २८१ धावांपर्यंत मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची ८ बाद २१५ अशी अवस्था असताना पाऊस आला आणि डकवर्थ-लुइस नियमांनुसार ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली.
२०११च्या विश्वचषकामध्ये पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ सलग तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. हा विश्वचषक त्यांनी जिंकला असता तर तीनदा विश्वचषकाला गवसणी घालणारा पाँटिंग हा पहिला कर्णधार ठरला असता. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाची चांगली सुरुवात केली. साखळी सामन्यांमध्ये त्यांनी चार सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढले ते यजमान भारताने. पाँटिंगने शतक झळकावले खरे, पण अखेरच्या षटकांमध्ये तो बाद झाला आणि याचाच राग त्याने पॅव्हेलियनमधील टीव्हीवर काढला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २६१ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण करत ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले.
शब्दांकन – प्रसाद लाड

बलस्थाने आणि कच्चे दुवे
घरच्या प्रेक्षकांचा नक्कीच ऑस्ट्रेलियाला फायदा होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघावर नजर टाकली तर आठव्या क्रमाकांपर्यंत त्यांच्याकडे फलंदाज आहे. संघामध्ये सर्वाधिक अष्टपैलू आहेत. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी तडाखेबंद फलंदाजीचे नमुने पेश केले आहेत. गोलंदाजीमध्ये मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क चांगल्या फॉर्मात आहेत. ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉल्कनर, झेव्हियर डोहर्टी आणि शेन वॉटसन हे अष्टपैलू खेळाडू संघाचे चार खांब असतील. ऑस्ट्रेलियाचे सारेच फलंदाज आक्रमक आहेत, त्यामुळे मोठे फटके मारण्याच्या नादात ते झटपट बाद होऊ शकतात. मधल्या किंवा तळाच्या फळीत अखेपर्यंत संयतपणे फलंदाजी करणारा एकही खेळाडू त्यांच्याकडे नाही. ऑस्ट्रेलियाकडे चांगला वेगवान मारा असला तरी त्यांची फिरकी गोलंदाजी सुमार आहे आणि त्याचाच फायदा प्रतिस्पर्धी उचलू शकतात.

अपेक्षित कामगिरी
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे, त्या जोरावर ‘अ’ गटामध्ये ते अव्वल स्थान पटकावतील, अशी आशा आहे. न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड या मातब्बर संघांशी त्यांना साखळी फेरीमध्ये दोन हात करावे लागतील. पण त्यांची विजयाची भूक पाहता ते साखळी फेरी सहज पार करतील, फक्त ते अव्वल क्रमांक पटकावतात का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.