सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयपीएलव्यतिरिक्त कामकाजांकरिता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रभारी अध्यक्षपद सांभाळणारे माजी कसोटीपटू शिवलाल यादव रविवारी होणाऱ्या तातडीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
‘‘रविवारी माझ्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे,’’ असे यादव यांनी सांगितले. बीसीसीआयच्या संकेतस्थळावर सुनील गावस्कर यांना कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष असे नमूद करण्यात आले आहे. वस्तुत: सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे आयपीएल संदर्भातील प्रभारी अध्यक्षपद सोपवले होते.
‘‘गावस्कर या बैठकीला हजर राहणार आहेत का, याची मला माहिती नाही. कारण सध्या ते दुबईत आयपीएलच्या संयोजनाची जबाबदारी पार पाडत आहेत,’’ असे यादव यांनी सांगितले.