यजमान रशियाला नमवून अव्वल स्थानी झेप

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एकमेव गोल पोर्तुगाल संघाला कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पध्रेत यजमान रशियाविरुद्ध विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला. पोर्तुगालने १-० अशा विजयाची नोंद करताना ‘अ’ गटात अव्वल स्थानी झेप घेतली. साखळी गटातील अखेरच्या लढतीत पोर्तुगालसमोर न्यूझीलंडचे, तर रशियासमोर मेक्सिकोचे आव्हान असणार आहे. या सामन्यांतील निकालानंतर उपांत्य फेरीत कोणता संघ प्रवेश करेल हे निश्चित होईल.

मेक्सिकोविरुद्धच्या पहिल्या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर पोर्तुगालला बुधवारी विजय मिळवणे आवश्यक होते. त्या दृष्टीने खेळ करताना त्यांनी रशियाच्या बचावफळीला निष्प्रभ केले. पोर्तुगालच्या आक्रमणासमोर रशियाचे खेळाडू हतबल झाले. त्याचाच फायदा उचलताना रिअल माद्रिद क्लबचा प्रमुख खेळाडू रोनाल्डोने आठव्या मिनिटाला पोर्तुगालचे खाते उघडले. राफेल अ‍ॅडलिनोच्या पासवर गोलजाळीसमोर उभ्या असलेल्या रोनाल्डोने हेडरद्वारे अप्रतिम गोल केला. शंभरावा सामना खेळणाऱ्या रशियाच्या गोलरक्षक इगोर अ‍ॅकिन्फीव्हला तो अडवण्यात अपयश आले. या गोलनंतर पोर्तुगालच्या खेळाडूंनी चेंडूवर अधिक काळ ताबा राखला. रशियाकडूनही तितकाच जोरदार प्रहार झाला, परंतु त्यांना पोर्तुगालची बचावफळी भेदण्यात अपयश आले.

पोर्तुगालचा आजचा खेळ हा अधिक आक्रमक जाणवत होता. चेंडूवर ताबा ठेवण्याबरोबरच त्यांच्याकडून सातत्याने गोल करण्याच्या संधीही निर्माण होत होत्या. मात्र त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश येत होते. यावेळी रशियाच्या खेळाडूंकडून रडीचा डावही खेळण्यात आला. त्यांच्या डीझिकीया, ग्लुशाकोव्ह आणि सॅमेडोव्ह यांना पंचांनी पिवळे कार्ड दाखवले. पोर्तुगालने मेक्सिकोविरुद्धच्या चुका टाळताना निर्धारित वेळेत सामन्यात १-० अशी आघाडी राखण्यात यश मिळवले. चार मिनिटांच्या भरपाई वेळेत रशियाला सामन्यात बरोबरी मिळवण्याची संधी होती, परंतु डीझिकीयाने हेडरद्वारे टोलावलेला चेंडू गोलजाळीवरून गेला आणि पोर्तुगालने सुटकेचा नि:श्वास टाकला.