इंग्लंडविरुद्ध पुण्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय साजरा करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ गुरूवारी कटकच्या बाराबाती स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. कटकमध्ये होणारा सामना जिंकून भारतीय संघाला एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. पहिल्या सामन्यातील भारतीय संघाचा फॉर्म पाहता नक्कीच आपले पारडे जड आहे. पण इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे अपरिहार्य असणार आहे.
कटकचे बाराबाती स्टेडियम भारतीय संघासाठी आजवर फायदेशीर ठरले आहे.

VIDEO: कटक सामन्यासाठी विराट कोहली नेटमध्ये असा करतोय सराव

 

बाराबाती स्टेडियमवर भारतीय संघाचे आजवर १५ सामने झाले असून यातील ११ सामन्यांत भारताने विजय साजरा केला आहे. तर चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. या स्टेडियमवरील गेल्या १० वर्षांचा इतिहास पाहता येथे केवळ पाच सामने खेळले गेले असून पाचही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. २००८ साली भारताने याच स्टेडियमवर शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडला सहा विकेट्सने धूळ चारली होती. या स्टेडियमवर भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघांना प्रत्येकी दोन वेळा विजय प्राप्त केला आहे. तर इंग्लंडविरुद्ध एकदा या स्टेडियमवर भारताने विजय मिळवला आहे. याशिवाय, शिखर धवनने या स्टेडियमवर शतकी खेळी देखील साकारली होती. भारतीय फलंदाजांसाठी हे स्टेडियम फायदेशीर ठरले आहे. संघाची फलंदाजी बाजू सध्या भक्कम असल्याने दुसऱया सामन्यात देखील भारतीय संघ इंग्लंडवर वरचढ ठरेल, अशी आशा आहे. बाराबाती स्टेडियमवर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम देखील भारतीय संघाच्याच नावावर आहे. भारतीय संघाने या स्टेडियमवर ३६३ धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघाची या स्टेडियमवरील ही यशस्वी कामगिरी पाहता कटकमध्ये भारतीय संघ आपला विजयीरथ कायम राखेल, अशी आशा आहे.

वाचा: विराटमध्ये कॅप्टनशीपची उपजत क्षमता, कोहलीच्या प्रशिक्षकाचे मत