पूर्वार्धात ११-२५ अशा पिछाडीवर असलेल्या पुणेरी पलटणने दिल्ली दबंगविरुद्ध उत्तरार्धात आघाडी मिळविली, मात्र शेवटच्या दीड मिनिटांत त्यांनी केलेल्या चुकांमुळेच त्यांना प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीविरुद्ध ३७-३८ असा पराभव स्वीकारावा लागला.
उत्कंठापूर्ण लढतीत सुरुवातीच्या १-४ अशा पिछाडीवरून दिल्लीने पूर्वार्धात दोन लोण नोंदवत एकतर्फी आघाडी मिळविली होती. त्यामध्ये त्यांच्या रोहित कुमारने एका चढाईत चार गुण तर अन्य एका चढाईत तीन गुण खेचून मोठा वाटा उचलला. पूर्वार्धात पुण्याच्या खेळाडूंनी पकडी करताना खूप चुका करीत गुण गमावले. उत्तरार्धात त्यांनी या चुका टाळण्यात यश मिळवले. २९व्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण चढवला. पुन्हा आणखी एक लोण चढवत त्यांनी ३५व्या मिनिटाला ३३-३३ अशी बरोबरी साधली. त्याचे श्रेय कर्णधार वझीर सिंग व प्रवीण नेवाळे यांनी केलेल्या खोलवर चढायांना द्यावे लागेल. शेवटचे मिनिट बाकी असताना पुण्याकडे ३७-३६ अशी आघाडी होती, मात्र दिल्लीच्या काशिलिंग आडकेने एक गुण मिळवत ३७-३७ अशी बरोबरी साधली. शेवटच्या चढाईला गेलेल्या वझीर सिंगची पकड करीत दिल्लीच्या रवींदर सिंगने संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
दिल्लीकडून रोहितकुमार चौधरीने चढाईत तीन बोनस गुणांसह ११ गुण नोंदवले तर काशिलिंगने चढाईत दोन बोनस गुणांसह १२ गुणांची कमाई केली. पुण्याकडून वझीर सिंगने दोन बोनस गुणांसह १३ गुण नोंदवले तर प्रवीण नेवाळेने चढाईत आठ गुणांची कमाई केली.
यू मुंबाचा सलग पाचवा विजय
यू मुंबा संघाचा विजयरथ रोखणे अवघड असल्याचा प्रत्यय बंगालमध्येसुद्धा आला. यू मुंबाने यजमान बंगाल वॉरियर्स संघावर २९-२५ अशी मात केली व पाचवा विजय मिळवत अव्वल स्थान राखले. पूर्वार्धातील ९-११ अशा पिछाडीनंतर बंगालने ३०व्या मिनिटाला २३-१६ अशी आघाडी घेतली होती. त्यामध्ये त्यांनी एक लोणही नोंदवला. मात्र अनुप कुमारच्या खोलवर चढायांच्या जोरावर यू मुंबा संघाने सामन्याला पुन्हा कलाटणी दिली. त्यांनी शेवटची पाच मिनिटे बाकी असताना हा लोण परतवत २५-२३ अशी आघाडी घेतली. हा लोण बंगालकरिता खूप महागात पडला. त्यांनी बरोबरीसाठी खूप प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. मुंबा संघाकडून अनुप कुमारने चढाईत दोन बोनस गुणांसह आठ गुण मिळवले, तसेच त्याने एक पकडही केली. बंगालकडून महेंद्र रजपूताने चढाईत सहा गुण मिळवले तर सचिन खांबेने पकडीत चार गुणांची कमाई केली.