शतक महोत्सवी वर्षांनिमित्त येथील यशवंत व्यायामशाळेच्या वतीने तसेच जिल्हा संघटनेच्या सहकार्याने आयोजित वरिष्ठ गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेत मित्रविहारने विजेतेपद मिळविले.

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम लढतीत यजमान यशवंत व्यायामशाळेने पहिले दोन सेट जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर मित्रविहारच्या खेळाडूंनी तिसरा व चौथा सेट जिंकून सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. पाचवा निर्णायक सेट मित्रविहारने १५-१३ असा जिंकून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. सिडकोच्या युनायटेड स्पोर्ट्स संघाने तृतीय स्थान मिळविले.

महिलांमध्ये नाशिकच्या वीरेंद्र क्रीडा मंडळाने नाशिकरोडच्या रेणुका क्रीडा मंडळ (अ) संघाचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेत पुरुषांच्या २६, तर महिलांच्या नऊ  संघानी सहभाग घेतला. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणेश तांबे (यशवंत व्यायामशाळा), अमित आहेर (मित्रविहार), राजश्री शिंदे (वीरेंद्र क्लब), भाग्यश्री सोनवणे (रेणुका मंडळ) यांना गौरविण्यात आले.

सामन्याचा पारितोषिक वितरण समारंभ समर्थ बँकेचे उपाध्यक्ष मकरंद सुखात्मे, स्माईल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य वाघ, यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, मित्रविहार संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव वाघ, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष आनंद खरे आदींच्या उपस्थितीत झाला.

अमर हिंद, शिवशक्ती, अंकुर उपांत्य फेरीत

मुंबई  : मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद कुमारी गट कबड्डी स्पर्धेत अमर हिंद, अंकुर, गोल्फादेवी यांच्यासह शिवशक्ती संघांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली. अमर हिंदने ओम ज्ञानदीप मंडळावर ५०-२२ असा विजय मिळवला. तेजश्री सारंग व दिव्या रेडकर यांनी दिमाखदार खेळ केला. अंकुर स्पोर्ट्स क्लबने शिवशक्ती ‘ब’ वर ३५-२४ अशी मात केली. या विजयात कोमल दारुगडे व कांचन जुहीकर चमकल्या.

गोल्फादेवी संघाने नवजवान सेवा मंडळाचा ५०-८ असा धुव्वा उडवला. जागृती घोसाळकर आणि अश्विनी जंगम यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. शिवशक्ती ‘अ’ संघाने ओम साई क्रीडा मंडळाचा ४७-१० असा पराभव केला. काजल पवार व सुधा पोवार यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुखापतीमुळे इनिएस्टाला विश्रांती

माद्रिद : बार्सिलोनाचा कर्णधार अ‍ॅड्रेस इनिएस्टा गुडघ्याचे स्नायू दुखावल्यामुळे सहा ते आठ आठवडे खेळू शकणार नाही. व्हॅलेन्सियाविरुद्धच्या लढतीत इनिएस्टाला ही दुखापत झाली.