३८ अंश सेल्सियसमुळे खेळात व्यत्यय; हॅलेपचा पराभव; मरे, फेडरर, कर्बर, व्हिनस दुसऱ्या फेरीत

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या पहिल्याच फेरीत दिग्गज खेळाडूंना वाढलेल्या तापमानाने हैराण केले. ३८ अंश सेल्सियस तापमानात खेळताना दिग्गज खेळाडूंचा चांगलाच घाम निघालेला पाहायला मिळाला. या आव्हानात्मक परिस्थितीत अँडी मरे, रॉजर फेडरर, अँजेलिक कर्बर आणि व्हिनस विल्यम्स यांनी पहिल्या फेरीचा अडथळा पार करत आगेकूच केली. रोमानियाच्या सिमोना हॅलेपला मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ब्रिटनच्या मरेला पहिल्याच लढतीत दोन तास ४७ मिनिटे संघर्ष करावा लागला. युक्रेनच्या आल्या मार्सेन्कोने त्याला कडवी झुंज दिली, परंतु मरेने ७-५, ७-६ (७/५), ६-२ असा विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. वाढत्या तापमानामुळे खेळाडू विश्रांती वेळेत बर्फाचे तुकडे डोक्यावर घेऊन बसलेले पाहायला मिळाले. ‘‘येथे याआधी विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे आजच्या या निकालाचा आनंद आहे,’’ अशी प्रतिक्रिया मरेने दिली.

पुरुष गटातील दुसऱ्या लढतीत स्वित्र्झलडच्या स्टॅन वावरिंकाने स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझनवर ३ तास २४ मिनिटांच्या संघर्षांनंतर ४-६, ६-४, ७-५, ४-६, ६-४ असा विजय मिळवला. पाचव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीलाही साडेतीन तास संघर्ष करावा लागला. त्याने रशियाच्या अँड्रेय कुझनेस्तोव्हचे आव्हान ५-७, ६-१, ६-४, ६-७ (६/८), ६-२ असे परतवून लावले.

३५ वर्षीय रॉजर फेडररचा संघर्ष पहिल्या फेरीतही कायम राहिला. २०११मध्ये मोनॅको येथे ऑस्ट्रियाच्या जुर्गेन मेल्झरने फेडररला नमवले होते आणि येथे पहिल्याच लढतीत हे दोघे पुन्हा समोरासमोर आले. मात्र, या वेळी फेडररने ७-५, ३-६, ६-२, ६-२ अशा फरकाने मेल्झरला नमवून पराभवाची परतफेड केली. ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात्र विजयासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. त्याने पोर्तुगालच्या गॅस्टाओ एलिआसवर ६-१, ६-२, ६-२ असा अवघ्या १ तास २४ मिनिटांत विजय मिळवला. चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डिचला इटलीच्या लुका व्हॅन्नीने माघार घेतल्यामुळे विजयी घोषित करण्यात आले. फ्रान्सच्या जो-विलफ्रीड त्सोंगाने ६-१, ६-३, ५-७(५/७), ६-२ अशा फरकाने ब्राझीलच्या थिएगो मोंटेइरोवर मात केली.

महिला विभागात धक्कादायक निकालाची नोंद झाली. चौथ्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हॅलेपला अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सकडून ६-३, ६-१ असा पराभव पत्करावा लागला.  अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सने ७-५ (७/५), ७-५ अशा फरकाने युक्रेनच्या कॅटेरिना कोझलोव्हावर १ तास ५९ मिनिटांत मात केली. गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने २ तास ३ मिनिटे चाललेल्या लढतीत युक्रेनच्या लेसीया त्सुरेंकोवर ६-२, ५-७, ६-२ असा विजय मिळवला. स्पेनच्या गार्बिने मुगुरूझाने न्यूझीलंडच्या मारिना इराकोव्हीकला ७-५, ६-४ असे नमवण्यासाठी १ तास ३७ मिनिटांचा वेळ घेतला.

‘‘पुन्हा टेनिस खेळण्याचा आनंद होत आहे. आशा करतो ही विजयी मालिका दीर्घ काळ कायम राखता येईल,’’ अशी प्रतिक्रिया फेडररने सामन्यानंतर दिली. १७ ग्रॅण्डस्लॅम नावावर असलेल्या फेडररला गतवर्षी दुखापतीमुळे चढ-उतारांचा प्रवास करावा लागला होता.

इतर निकाल पुरुष एकेरी

जेरेमी चॅर्डी (फ्रान्स) वि. वि. निकोलस अल्माग्रो (स्पेन) ४-० (निवृत्त); रियान हॅरिसन (अमेरिका) वि. वि. निकोलस मॅहुट (फ्रान्स) ६-३, ६-४, ६-२; बेर्नार्ड टॉमिक (ऑस्ट्रेलिया) वि. वि. थॉमॅझ बेलुस्सी (ब्राझील) ६-२, ६-१, ६-४; जॉन इस्नर (अमेरिका) वि. वि. कोन्स्टाटिन क्रॅव्हचुक (रशिया) ६-३, ६-४, ६-७(५/७), ६-१; मारिन सिलिक (क्रोएशिया) वि. वि. जेर्झी जॅनोविझ (पोलंड) ४-६, ४-६, ६-२, ६-२, ६-३.