दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जे पी डय़ुमिनी हा इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आठव्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे, अशी घोषणा गुरुवारी दिल्ली संघातर्फे करण्यात आली़  गेल्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या डय़ुमिनीला दिल्ली संघाने यंदा पुन्हा आपल्या चमूत घेतले आह़े  नुकतीच दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्वही त्याच्याकडे सोपवण्यात आले आह़े  ‘‘संघाकडून मिळत असलेला पाठिंबा आणि त्यांनी दाखविलेल्या विश्वासासाठी मी आभारी आह़े  प्रतिभावंत खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो़  या हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे, ’’ अशी प्रतिक्रिया डय़ुमिनीने दिली़  दिल्लीचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणाले की, ‘‘येणाऱ्या हंगामात संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी डय़ुमिनी ही योग्य निवड आह़े  त्याच्याकडे अनुभव आहे आणि संघाला पुढे घेऊन जाण्याची वर्तणूक आह़े  त्याच्या प्रगतीचा आलेख मी पाहिले आह़े ’’   

जेसी रायडर निलंबित
वेलिंग्टन : नेहमी कुठल्या ना कुठल्या वादात अडकणारा न्यूझीलंडचा फलंदाज जेसी रायडर पुन्हा एका नव्या वादंगात सापडला आहे. रायडरने येथील स्थानिक स्पध्रेत ओटॅगो संघाकडून खेळताना नॉदर्न डिस्ट्रिक्टविरुद्धच्या सामन्यात तीव्र नाराजी व्यक्त केली होती़  या लढतीत झेलबाद झाल्यानंतर रायडरने गैरवर्तवणूक केली आणि शिव्या देत पॅव्हेलियनमध्ये तोडफोडही केली. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आह़े

भारतीय संघात स्थान मिळाल्याने आनंदी – मनदीप
नवी दिल्ली : ‘‘आशियाई स्पध्रेत भारतीय संघातून मला वगळले होत़े  पण, तरीही मी खचून गेलो नाही़  उलटपक्षी या घटनेतून मला दमदार पुनरागमन करण्याची प्रेरणा मिळाली,’’ असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचा आघाडीपटू मनदीप सिंग याने व्यक्त केल़े  त्याने मलेशियातील इपोव्ह येथे होणाऱ्या सुलतान अझलन चषक स्पध्रेसाठीच्या भारतीय संघात स्थान पटकावले आह़े  मनदीपने हॉकी इंडिया लीगमध्ये अप्रतिम कामगिरी करून निवड समितीला दखल घेण्यास भाग पाडल़े  
सेरेनाचा ‘मियामी’चे जेतेपद राखण्याचा मानस
मियामी : महिलांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेली सेरेना विल्यम्स गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. दुखापतग्रस्त असूनही सेरेना शुक्रवारी एटीपी व डब्ल्यूटीए मियामी खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद राखण्यासाठी कोर्टवर उतरणार आह़े   

कबड्डी : भारत पेट्रोलियम, एअर इंडियाची भरारी
मुंबई : भारत पेट्रोलियम आणि एअर इंडिया संघांनी आमदार चषक राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पध्रेत विजयी सलामी दिली़  पेट्रोलियमने महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचा २९-१४, तर एअर इंडियाने महाराष्ट्र राज्य पोलिसांचा ३४-१६ असा पराभव करून विजयी सलामी दिली़  पेट्रोलियमने रिशांक देवाडिगा आणि सुनील आडके यांच्या चढायांच्या बळावर मध्यंतराला १८-१० अशी आघाडी घेतली होती़  उत्तरार्धात पेट्रोलियमने आणखी खेळ उंचावून हा सामना सहज जिंकला़  एअर इंडियाला विजयासाठी फार झगडावे लागले नाही़ अजय चौधरी, दीपक हुडा व योगेश हुडा यांच्या आक्रमणासमोर पोलिसांचा बळाव खिळखिळा केला़  मध्यंतराला २०-९ अशी आघाडी घेतलेल्या एअर इंडियाने अखेर ३४-१६ अशी बाजी मारली़

फुटबॉल : यू. के. युनायटेडचा पराभव
मुंबई : डॅरी क्रास्टो स्मृतिचषक फुटबॉल स्पध्रेत पुरुष गटाच्या तिसऱ्या फेरीत ऑटोनॉमस एससी संघाने यू़  के. युनायटेड संघाचा २-० अशा फरकाने पराभव केला़  राफेल डायस, अमित नांबियार यांनी प्रत्येकी एक गोल करून ऑटोनॉमसचा विजय निश्चित केला़  दुसऱ्या लढतीत किगन कार्वाल्हो, अ‍ॅग्नेलो पिकाडरे, अ‍ॅलन फर्नाडीस यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर कलिना व्हिलेज संघाने जुहू स्पोर्ट्स क्लबचा ३-० असा पराभव केला़

हॉकी : रजिताच्या हॅट्ट्रिकने मध्य रेल्वे विजयी
मुंबई :  एस. रजिताच्या हॅट्ट्रिकमुळे मध्य रेल्वे संघाने ३६व्या अखिल भारतीय रेल्वे हॉकी अजिंक्यपद स्पध्रेत चित्रांजन लोकोमोटिव्ह वर्क्‍स संघावर ६-० असा सोपा विजय साजरा केला़  सरिता मिंझ, रश्मी सिंग, कविता विद्यार्थी यांनी प्रत्येकी एक गोल करून रजिताला उत्तम साथ दिली़  दक्षिण पूर्व रेल्वेनेही बिनिता झेक्सच्या हॅट्ट्रिकच्या बळावर पश्चिम रेल्वेचा ८-०ने धुव्वा उडवला़  

उन्हाळी प्रशिक्षण वर्ग
मुंबई :  बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानतर्फे उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आह़े  या वर्गात जिम्नॅस्टिक, जलतरण, रोलर स्केटिंग, कराटे, टेबल टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, रोप स्कीपिंग, स्क्वॉश या खेळांचा समावेश आहे. १५ एप्रिल ते १० जून या कालावधीत हे वर्ग घेतले जातील़  अधिक माहितीसाठी रवींद्र कुडतरकर ९८६९११७७९२ यांच्याशी संपर्क साधावा़