इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात गुरूवारी इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघाचा अवघ्या ६० धावांत खुर्दा उडाला. आजपासून नॉटिंगहॅम येथे या कसोटीला सुरूवात झाली. गोलंदाजीला असणारे पोषक वातावरण पाहता इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज टिकाव धरू शकला नाही. ब्रॉडने अवघ्या १५ धावांत ऑस्ट्रेलियाच्या आठ फलंदाजांना माघारी धाडण्याची किमया साधली. याबरोबरच ब्रॉडने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३०० बळींचा टप्पाही गाठला. ब्रॉडच्या या कामगिरीमुळे इंग्लडने मालिकेतील या अखेरच्या कसोटीवर पहिल्याच दिवशी वर्चस्व मिळवले आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सवर इंग्लंडला चारीमुंडय़ा चीत केले होते. तिसऱ्या कसोटीत पुनरागमनाचा वस्तुपाठ सादर करत इंग्लंडने दिमाखदार विजय मिळवला होते. त्यामुळे अॅशेस मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला ही कसोटी बरोबरीत सोडविण्याची गरज होती. दरम्यान, आता इंग्लिश संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला असून ऑस्ट्रेलियन गोलंदाजही काही भन्नाट कामगिरी करून दाखवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.