इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सोमवारी अटक झाल्याचं वृत्त इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेलं आहे. ब्रिस्टॉल शहरात सोमवारी स्टोक्सला अटक करण्यात आली, यानंतर एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर स्टोक्सला कोणत्याही चौकशी आणि गुन्हा दाखन न करता सोडूनही देण्यात आलंय. स्टोक्ससोबत त्याचा सहकारी अॅलेक्स हेल्सही हजर होता. या दोघांवरही इंग्लड क्रिकेट बोर्डाने कारवाई करण्याचं ठरवलं आहे, वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या पाचव्या वन-डे सामन्यात या दोन्ही खेळाडूंना वगळण्यात आलंय.

बीबीसी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, वेस्ट इंडीजविरुद्ध तिसरा वन-डे सामना जिंकल्यानंतर हा प्रकार घडल्याचं समजतंय. सामना जिंकल्यानंतर होत असलेल्या सेलिब्रेशनमध्ये स्टोक्सने नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारात स्टोक्सलाही दुखापत झाल्याचं कळतंय. या घडलेल्या प्रकारानंतर अॅलेक्स हेल्स ब्रिस्टॉल शहरातील स्थानिक पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या दृष्टीने शहरातच थांबला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा संचालक अँड्रू स्ट्रॉसने या घटनेची क्रिकेट बोर्ड स्वतंत्र चौकशी करेल, असं आश्वासन दिलं आहे.

बेन स्टोक्स आणि अॅलेक्स हेल्स हे वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळणार नसल्याचं, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने स्पष्ट केलंय.

त्यामुळे या प्रकरणाता आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पहावं लागणार आहे.