इंग्लंडच्या मोहम्मद फराहने जागतिक अिजक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सोनेरी हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीपाठोपाठ पाच हजार मीटर धावण्याची शर्यतही जिंकली.
फराहने २०१२मध्ये लंडनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत याच दोन्ही शर्यती जिंकल्या होत्या. पाठोपाठ त्याने २०१३मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत याच दोन्ही शर्यतींचे विजेतेपद मिळवले होते. बीजिंगमध्ये त्याने याच कामगिरीची पुनरावृत्ती केली. शनिवारी त्याने पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना हे अंतर १३ मिनिटे ५०.३८ सेकंदांत पार केले. केनियाच्या कालेब म्बागांगी एन्डीक्यूने ही शर्यत १३ मिनिटे ५१.७५ सेकंदांत पूर्ण केली व रौप्यपदक जिंकले. इथिओपियाच्या हॅगोस गेव्रीवेटला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने हे अंतर १३ मिनिटे ५१.८६ सेकंदांत पार केले. फराहने जागतिक स्पर्धेत आजपर्यंतच्या कारकीर्दीत सातवे विजेतेपद मिळविले. पाच हजार मीटर शर्यतीत त्याचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे.
डेकॅथलॉनमध्ये अ‍ॅशटोनचा विश्वविक्रम
अमेरिकेच्या अ‍ॅशटोन ईटोनने डेकॅथलॉनमध्ये ९०४५ गुण नोंदवत विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी त्यानेच ९०३९ गुणांचा विश्वविक्रम नोंदवला होता. त्याने येथे या क्रीडा प्रकारातील पहिल्या क्रीडा प्रकारापासूनच आघाडी घेतली होती.