एक सार्वकालिन महान खेळाडू तर दुसरा जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू. एक शांत, गंभीर व पारंपरिक टेनिसचा पाईक, तर दुसरा गमत्या, प्रेक्षकांशी संवाद साधत खेळणारा आधुनिक टेनिसचा शिलेदार. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच या दोघांमधील मुकाबल्यात फेडरर १९-१७ असा निसटता आघाडीवर. एकाच पर्वातल्या दोन दिग्गजांमध्ये रंगणाऱ्या ग्रँडस्लॅम द्वंद्वांची झलक इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेत पाहायला मिळाली.
चाहत्यांना अव्वल दर्जाच्या टेनिसची अनुभूती देणाऱ्या लढतीत फेडररने जोकोव्हिचवर ६-५ असा विजय मिळवला. क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा ताणणाऱ्या लढतीत अफलातून खेळासह मुकाबला ५-५ असा बरोबरीत सुटला. टायब्रेकरमध्ये फेडररने सारा अनुभव पणाला लावत बाजी मारली. युएई रॉयल्स संघाने इंडियन एसेसवर २९-२२ अशी मात केली. सलामीच्या लढतीत रॉयल्सच्या क्रिस्तिना लाडेनोव्हिकने एसेसच्या अ‍ॅना इव्हानोव्हिकवर ६-५ असा विजय मिळवला. माजी खेळाडूंच्या लढतीत रॉयल्सच्या गोरान इव्हानिसोव्हिकने एसेसच्या फॅब्रिस सँटोरोवर ६-३ अशी मात केली. मिश्र दुहेरीत लाडेनोव्हिक-नेनाद झिम्नोझिक जोडीने फेडरर-मिर्झा जोडीला ६-२ असे नमवले. फेडरर-मॉनफिल्स जोडीने जोकोव्हिच-झिम्नोझिक जोडीवर ६-५असा विजय मिळवला.