१७ वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद प्रथमच भारताला मिळाले. ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेतील आठ सामने डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. या स्पर्धेसाठी नेरुळमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाचा कायापालट होऊ  लागला आहे. ‘फिफा’च्या मैदानासाठी लागणारे गवत अमेरिकेहून, मैदानावरील विद्युत यंत्रणा इटलीवरून आणण्यात आली आहे. फिफाच्या तांत्रिक पथकाने मैदानाची नुकतीच पाहणी केली. ‘फिफा’च्या नियमावलीनुसार मैदानाचे काम चांगले असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. ३० सप्टेंबपर्यंत प्रकाशझोत यंत्रणा पूर्णत्वास जाईल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

नेरुळ सेक्टर-१९ मधील यशवंतराव चव्हाण मैदानाचा कायापालट करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. सरावासाठी डी. वाय. पाटील संकुलातील मुख्य मैदान, युनिव्हर्सिटी मैदान, वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबचे मैदान व नेरुळमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाची यासाठी निवड करण्यात आली. तांत्रिक पथकात डिन गिलेस्बे, ‘सिस्टीम रेक्स’चे अभय पाटणकर, पालिकेचे कार्यकारी अभियंता अजय संख्ये आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

फिफा मैदानाच्या निर्मितीसाठी दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. मैदानावर अत्यंत उत्तम अशी पाणी वाहून नेण्याची यंत्रणा आहे. पावसातही मैदानावर सराव करता येणार आहे. मैदानाच्या ‘लॉन’ निर्मितीसाठी लागणाऱ्या गवताच्या बिया अमेरिकेहून आणल्या गेल्या आहेत. मैदानासाठी वापरण्यात आलेली वाळू बेळगाव जवळच्या पट्टय़ातून आणली आहे.

फुटबॉलसाठी आवश्यक गोल पोस्ट, खेळाडूंसाठी जागा, प्रत्यक्ष सरावाच्या मैदानाभोवतीचे विशिष्ट कुंपणभिंत बांधण्यात आहे. मैदानाभोवती चार ३० मीटर उंचीचे चार स्टेडियम मास्ट लावण्यात येणार आहेत. एका मास्टवर २००० वॉटच्या ११ फिटिंग असतील. चार मास्टवर ४४ फिटिंग असतील. ही सर्व यंत्रणा इटलीवरून मागविण्यात आली आहे. यासाठी सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च आला आहे.