ब्रेबॉर्न स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या रणजीविजेता गुजरात आणि शेष भारत यांच्यातील इराणी करंडक क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने मुंबईकर क्रीडारसिकांना रंगतदार लढतीचा अनुभव मिळेल. उर्वरित हंगामात भारताला आणखी पाच कसोटी सामने खेळायचे असल्यामुळे निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधून घेण्याची संधी यानिमित्ताने खेळाडूंना मिळणार आहे.

विजयी घोडदौड राखणाऱ्या भारतीय संघात तसा रिक्त स्थानांचा अभाव आहे; परंतु भविष्यात संधी मिळण्याच्या आशेने इराणी करंडकाची लढत ही उत्तम व्यासपीठ ठरू शकेल. नुकतेच गुजरातने मुंबईला नमवून प्रथमच रणजी जिंकण्याचा पराक्रम दाखवला. पार्थिव पटेलने जबाबदारीने नेतृत्व करीत संघाला हे यश मिळवून दिले. याचप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वृद्धिमान साहा दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, तेव्हासुद्धा पार्थिवने भारताच्या यष्टिरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. त्यामुळे या सामन्यात पार्थिव आणि वृद्धिमान यांच्या कामगिरीचीसुद्धा नोंद घेतली जाईल. तामिळनाडूला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवणारा अभिनव मुकुंद, मुंबईचा सलामीवीर अखिल हेरवाडकर, गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाळ या खेळाडूंच्या कामगिरीकडे निवड समितीचे विशेष लक्ष असेल.

शेष भारताचे नेतृत्व  चेतेश्वर पुजारा सांभाळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरच्या समावेशामुळे हा संघ बलवान झाला आहे. याशिवाय मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज मनोज तिवारी आणि साहा यांचा या संघात समावेश आहे.

मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे हैदराबादचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शेष भारताच्या संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पंकज सिंग, सिद्धार्थ कौल, सिराज आणि के. विघ्नेश हे नवा चेंडू हाताळण्यासाठी उत्तम पर्याय असतील. याचप्रमाणे ‘चायनामन’ कुलदीप यादव आणि डावखुरा फिरकीपटू शाहबाझ नदीम हे फिरकीचे पर्याय असतील.

संघ

शेष भारत : अभिनव मुकुंद, अखिल हेरवाडकर, चेतेश्वर पुजारा (कर्णधार), करुण नायर, मनोज तिवारी, वृद्धिमान साहा, कुलदीप यादव, शाहबाझ नदीम, पंकज सिंग, के. विघ्नेश, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, अक्षय वाखरे, इशन किशन, प्रशांत चोप्रा.

गुजरात : समित गोहिल, प्रियांक पांचाळ, पार्थिव पटेल (कर्णधार), हेत पटेल, राहुल भट, मनप्रित जुनेजा, चिराग गांधी, रुश कलारिया, मोहित थंडानी, करण पटेल, हार्दिक पटेल, चिंतन गाजा, ध्रुव रावल, आर. पी. सिंग आणि ईश्वर चौधरी.

हा सामना गुजरात आणि शेष भारत या दोन संघांमध्ये आहे. मी आणि वृद्धिमान या दोन खेळाडूंमध्ये मुळीच नाही. त्याच्यातील गुणवत्ता सर्वानाच माहीत आहे. त्यामुळेच दोन संघांमधील लढत असेच इराणी सामन्याकडे पाहावे.   पार्थिव पटेल, गुजरातचा कर्णधार