बंगालचा युवा खेळाडू अंकित केसरीच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच, आणखी एका क्रिकेटपटूला झालेल्या गंभीर दुखापतीने क्रिकेटविश्व हादरले आहे. बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल घोषच्या डोक्याला खेळताना गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशन लीगच्या पोलीस एसी आणि विजय स्पोर्ट्स क्लब यांच्यातील लढतीदरम्यान हा प्रकार घडला.
सॉल्ट लेक परिसरातील व्हिडीओकॉन क्रिकेट ग्राऊंड मैदानात पोलीस एसी संघाचा राहुल कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत होता. असमान उसळी मिळालेला एक चेंडू राहुलच्या कानामागे आदळला. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात असताना राहुलची चेंडूवरील नजर हटली आणि चेंडू राहुलच्या कानावर जाऊन आदळला. त्याला तातडीने नाईटिंगेल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राहुलची प्रकृती स्थिर आहे मात्र धोका अद्यापही टळला नसल्याचे त्याच्यावर उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. बुद्धदेब साहा यांनी सांगितले. सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचणीत राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत आढळलेली नाही. डोक्यात अंतर्गत दुखापत किंवा हॅमरेजही झालेले नाही. मात्र त्याला अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे डॉक्टरांनी सांगितले.
याच रुग्णालयात उपचारांदरम्यान तीन दिवसांपूर्वी अंकित केसरीचा मृत्यू झाला होता. असा दुर्दैवी प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येणार असल्याचे बंगाल क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले.
अंकितच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देऊ – गंभीर
नवी दिल्ली : बंगालचा दिवंगत युवा खेळाडू अंकित केसरीच्या कुटुंबीयांना आमच्या फ्रँचाईजीतर्फे सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, असे कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर याने सांगितले. अंकितला एक दिवसीय सामन्याच्या वेळी मैदानावर झालेल्या खेळाडूंच्या चकमकीत मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचे हृदयविकाराच्या धक्क्य़ाने निधन झाले होते. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करीत गंभीर म्हणाला की,‘‘ अंकित हा आता आपल्यामध्ये नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र त्याच्या घरच्यांकरिता आपण मदत निश्चित करू शकतो.’’