यजमान इंग्लंडला सलामीच्या लढतीत सहज पराभूत करणाऱ्या भारतीय महिलांनी वेस्ट इंडिज संघाला ७ गडी राखून पराभूत करत विश्वचषकातील सलग दुसरा विजय नोंदवला. वेस्ट इंडिजने दिलेले १८३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ४२.३ षटकात ३ बाद १८६ धावा करत पार केले.  पहिल्या सामन्यात दमदार खेळी करणारी पुनम राऊत पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाली. या सामन्यात तिला खातेही उघडता आले नाही. भारताला पहिल्या षटकात धक्का बसल्यानंतर  मैदानात आलेल्या दिप्तीने संघाच्या धावसंख्येत केवळ १६ धावांची भर घातली. भारताला सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर सलामीवीर स्मृती मंधानाने कर्णधार मिताली राजसोबत संयमी खेळ करत भारतीय डावाला आकार दिला. कर्णधार मितालीने ८८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर स्मृती मंधानाने १०८ चेंडूत १०६ धावांची नाबाद शतकी खेळी केली. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ४२ षटकात ३ बाद १८३ धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या संघ गडबडल्याचे दिसले. फ्लॅचर (३६) अनिशा (११) यांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजला १८३ धावांपर्यंत मजल मारता आली.

त्यानंतर पुनम राऊत आणि स्मृती मंधानाने भारताच्या डावाला सुरुवात केली. पण भारताची सुरुवात खराब झाली. पुनम पहिल्याच षटकात बाद झाली. त्यानंतर दिप्तीला ही मैदानात तग धरता आला नाही. भारताची धावसंख्या ३३ असताना कर्णधार मिताली राज मैदानात आली. तिने सलामीवीर मंधानासोबत डावाला आकार दिला. अर्धशतकापासून अवघ्या ४ धावा दूर असताना ती बाद झाली. त्यानंतर मोना मेश्राम (१८) आणि मंधाना (१०६) धावा करत भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. नाबाद शतकी खेळी करणाऱ्या मंधानाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारतीय कर्णधार मिताली राजने मंधानाच्या खेळाचे कौतुक केले. मंधानाने योग्य वेळी शतकी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघ विजयी मोहिम कायम ठेवू शकला, असे मितालीने सामन्यानंतर सांगितले.