spt12चार वर्षांनी पुन्हा एकदा सारे क्रिकेटप्रेमी ज्याची वाट पाहतात, तो विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सारेच संघ उत्सुक असतात, त्यामधून कोणता संघ हा विश्वचषक जिंकेल, हे भाकीत करणे सोपे नाही. माझ्या मते भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पण त्यानंतर नेमके काय होईल, हे सांगणे कठीण आहे. पण भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांमध्ये वैविध्य आहे. ब्रिस्बेन आणि सिडनीची खेळपट्टी फिरकीला पोषक असेल, तर पर्थ आणि अन्य खेळपट्टय़ा वेगवान गोलंदाजीसाठी उपयुक्त असतील. न्यूझीलंडमध्येही वेगवान गोलंदाजांबरोबर मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर दक्षिण आफ्रिकेकडे ए बी डी’व्हिलियर्स, हशिम अमला, फॅफ डय़ू प्लेसिससारखे नावाजलेले फलंदाज आहेत, तर डेल स्टेनसारखा अनुभवी वेगवान गोलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये आहे. ऑस्ट्रेलियाकडे क्लार्कसारखा अनुभवी आणि आक्रमक कर्णधार आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथसारखे तडाखेबंद फलंदाज आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम आणि केन विल्यम्सन चांगल्या फॉर्मात आहेत.
भारताच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असून त्यांच्याकडे जास्त अनुभव नाही, पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे दांडगा अनुभव असून तो भारताला पुन्हा विश्वचषक जिंकवून देऊ शकतो. उमेश यादव, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडून मला मोठय़ा अपेक्षा आहेत. पण आर. अश्विन परदेशामध्ये जास्त चांगली कामगिरी करू शकलेला नाही, त्यामुळे त्याला संधी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. दोन डावखुऱ्या फिरकीपटूंपैकी कोणाला खेळवायचे हा मोठा प्रश्न असेल, कारण अक्षर पटेल चांगल्या फॉर्मात आहे, पण रवींद्र जडेजाकडे चांगला अनुभव आहे.
फलंदाजीमध्ये शिखर धवन चांगल्या फॉर्मात दिसत नाही, त्यामुळेच पहिल्या ५-१० षटकांमध्ये भारताला पहिला धक्का बसत आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा चांगले खेळत असून या दोघांची जोडी सलामीला येऊ शकते. सध्या भारतीय संघ विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयत्न करत असली तरी त्याला तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीला पाठवायला हवे, कारण तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज असायला हवा आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळताना कोहलीने चांगल्या धावाही केल्या आहेत. धोनी जगातील सर्वोत्तम ‘फिनिशर’ समजला जातो, त्यामुळे त्याच्यावर संघाची प्रमुख भिस्त असेल.
(शब्दांकन : प्रसाद लाड)