मॉरिशसवर मात; रॉबिन सिंग व बलवंत सिंग यांचे गोल; सलग नववा विजय

लंडनच्या लिबर्टी स्टेडियमवर मँचेस्टर युनायटेडने शनिवारी स्वानसी सिटीला ४-० अशी धूळ चारली.. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामात युनायटेडचा हा सलग दुसरा विजय आणि तोही ४-० अशा फरकाने मिळवलेला.. मात्र लिबर्टी स्टेडियमवर उपस्थित पन्नासेक हजारांहून अधिक प्रेक्षकांना लाजवेल असा उत्साह अंधेरी क्रीडा संकुलातील हजार-बाराशे फुटबॉलप्रेमींमध्ये ओसंडून वाहात होता. भारत आणि मॉरिशस यांच्यात तिरंगी मालिकेतील आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढत शनिवारी खेळवण्यात आली. भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक प्रयत्नांना टाळ्यांनी दाद देणारे हेच प्रेक्षक मॉरिशसच्या खेळाडूंना डिवचतही होते.. त्यात भारताचे प्रशिक्षक स्टिव्हन कॉन्स्टनटाइन आणि मॉरिशसचे प्रशिक्षक जोकिम फिल्हो यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीने प्रेक्षकांच्या ऊर्जेला जणू इंधन पुरवण्याचे काम केले. त्यानंतर त्यांचा उत्साह आणि भारतीय खेळाडूंचा उल्लेखनीय खेळ, याचा मनमुराद आस्वाद घेणेच बाकी होते. जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा बऱ्याच पिछाडीवर असलेल्या मॉरिशसच्या खेळाडूंनाही दाद द्यावी लागेल. त्यांनी चिवट खेळ करताना भारताच्या कमकुवत बाबी पुन्हा एकदा प्रदर्शनात आणल्या. भारताने २-१ अशा फरकाने हा सामना जिंकून अंधेरी क्रीडा संकुलातील विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

भर पावसात फुटबॉलचा आस्वाद लुटण्याच्या इराद्याने आलेल्या प्रेक्षकांना भ्रमनिरास झाला. पावसाची सर आली ती भारतीय पाठीराख्यांमध्ये तणावाचे वातावरण घेऊन. गेल्या वर्षभरात भारतीय पुरुष फुटबॉल संघाने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करताना जागतिक क्रमवारीत आगेकूच कायम राखली. मात्र या विजयी घोडदौडीत सिंहाचा वाटा उचलणारा सुनील छेत्री आजच्या या लढतीत नव्हता. ‘इंडियन मेस्सी’ असे फलक घेऊन मैदानावर आलेल्या चाहत्यांना छेत्रीचा सुरेख खेळ पाहण्यापासून वंचित राहावे लागले. छेत्रीच्या अनुपस्थितीत आक्रमणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रॉबिन सिंग आणि जेजे लाल्पेखलूआ यांची त्याची उणीव जाणवू दिली नाही. मात्र सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताचा खेळ ढिसाळ झाला. १६०व्या क्रमवारीवर असलेल्या मॉरिशसने यजमानांची बचावफळी सहज भेदली, परंतु अंतिम स्वरूप देण्यात त्यांना अपयश येत होते आणि ही भारतासाठी दिलासादायक बाब होती. मुंबई उपनगरात रिमझिम पाऊस पडत असताना, अंधेरीत मात्र त्याने दडी मारली आणि त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातही प्रेक्षकांचा उत्साह कुठे कमी पडत नव्हता. १४व्या मिनिटाला हलक्याशा सरीने गारवा आणला, परंतु सरीबरोबर तो क्षणात हरपला. पुढच्याच मिनिटाला जीन मेव्‍‌र्हीन जोसेलिनने व्हॉलीद्वारे गोल करताना मॉरिशसला १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि स्मशानशांतता पसरली. तीन सामन्यांनंतर भारताने पहिल्यांदाच गोल खाल्ला. त्यानंतर मॉरिशसच्या खेळाडूंनी सातत्याने आक्रमण सुरूच ठेवले. भारताचा मध्यरक्षक युजिंसेन लिंगडोह आणि रॉवलिन बोर्गेस यांनी लक्षणीय खेळ केला. बोर्गेसने ३७व्या मिनिटाला मध्यरेषेवरून दिलेला पास सामन्याला कलाटणी देणारा ठरला. पेनल्टी क्षेत्रानजीक असलेल्या रॉबिनने गोल करताना सामना १-१ असा बरोबरीत आणला.

मध्यंतरानंतर भारताने अमरिंदर सिंग, निखिल चंद्रशेखर आणि बलवंत सिंग असे तीन बदल केले. त्यामुळे भारताचा खेळ अधिक उंचावला. विश्रांतीच्या वेळेत कॉन्स्टनटाइन यांनी केलेल्या कानउघडणीनंतर भारतीयांच्या खेळातील बदल जाणवला. त्यांनी अधिक आक्रमक खेळ करताना चेंडूवर अधिक काळ ताबा राखला. जेजे, लिंगडोह, बोर्गेस, कर्णधार संदेश जिंघन या संघातील वरिष्ठ खेळाडूंनी अप्रतिम खेळाची चुणूक दाखवली. ६२व्या मिनिटाला बदली खेळाडू बलवंतने गोल करताना भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. चार वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या बलवंतने मॉरिशसच्या खेळाडूंना चांगलेच चकवले. अखेरच्या २० मिनिटांत दोन्ही संघांमध्ये चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. मॉरिशसने सामन्यात पुनरागमन करण्याचे सातत्याने प्रयत्न केले, परंतु अमरिंदरने त्यांना रोखून ठेवले. भारताला ही आघाडी वाढवण्याची संधी होती, परंतु आयती संधी त्यांच्याकडून हुकली आणि त्यांना २-१ अशा विजयावर समाधानी राहावे लागले.