फ्रान्स आणि पोलंड यांना नमवून जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरीत दरारा निर्माण करणाऱ्या भारताच्या पुरुष हॉकी संघासमोर शुक्रवारी बलाढय़ पाकिस्तानचे आव्हान आहे. ‘अ’ गटातील या लढतीत भारताची तयारी योग्य दिशेने चालली आहे की नाही, हे पाहण्याच्या दृष्टीने ही लढत फार महत्त्वाची आहे. कारण भारताला कडवी टक्कर देण्याची धमक पाकिस्तान संघामध्ये आहे.
आशियाई स्पर्धा विजेता भारत आणि चॅम्पियन्स चषक स्पध्रेत रौप्यपदक विजेता पाकिस्तान यांच्यातील ही लढत उत्कंठा वाढवणारी आहे. भारताने रिओ ऑलिम्पिकचा प्रवेश निश्चित केल्यामुळे ते या स्पध्रेत दबावाविना खेळत आहेत, तर पाकिस्तानसाठी ही स्पर्धा ऑलिम्पिक प्रवेश मिळवण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आक्रमक खेळ पाहायला नक्की मिळेल. या सामन्यातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित करणार आहे.
भुवनेश्वर येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर हे दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. चॅम्पियन्स चषक स्पध्रेतील त्या लढतीत विजयानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी बेभान जल्लोष केला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळे शुक्रवारच्या लढतीत तणावपूर्ण वातावरण नक्की पाहायला मिळेल. या स्पध्रेतील दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास भारताने फ्रान्स (३-२) आणि पोलंड (३-०) यांच्यावर विजय साजरे केले आहेत. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून (१-६) लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता़, मात्र पोलंडवर (२-१) विजय मिळवून त्यांनी पुनरागमन केले आहे.

पंच रघुप्रसाद यांचे शतक
भारताचे हॉकी पंच रघुप्रसाद आर.व्ही. यांनी १०० आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम करण्याचा विक्रम नावावर केला आहे. जागतिक हॉकी लीग उपान्त्य फेरीत बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दरम्यानच्या लढतीत त्यांनी हा विक्रम केला असून त्यांच्या या कामगिरीचे हॉकी इंडियाने कौतुक केले आहे. ‘‘रघुप्रसाद यांच्या कामगिरीचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. हे शिखर गाठणाऱ्या रघुप्रसाद यांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हॉकी इंडियाकडून शुभेच्छा,’’ असे हॉकी इंडियाचे सरचिटणीस मोह मुस्ताक अहमद यांनी सांगितले. बंगळुरू येथे जन्मलेल्या रघुप्रसाद यांनी २००३साली आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंच म्हणून सुरुवात केली. त्यांनी २०१४च्या विश्वचषक स्पर्धा, २०१३ पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धा आणि २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले होते.

पाकिस्तानविरुद्ध आम्हाला विजय मिळवायचा आहे, कारण पुढील लढतीत आमचा सामना विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी आहे आणि हा विजय आम्हाला मनोधर्य उंचावण्यास मदत करेल.
– सरदार सिंग,
भारतीय संघाचा कर्णधार

माझ्या मार्गदर्शनाखाली भारत पहिल्यांदा पाकिस्तान संघाविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे या सामन्याचा अनुभव माझ्यासाठी नवा आहे, परंतु २०१० साली दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पध्रेत या दोन्ही संघांमधील चुरस पाहिली होती.
– पॉल व्हॅन अ‍ॅस,
भारतीय संघाचे प्रशिक्षक

आशियाई स्पर्धा आणि चॅम्पियन्स चषक स्पध्रेनंतर संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. गटातील आमचे स्थान सुधारण्यासाठी ही लढत आम्हाला जिंकायची आहे.
– शाहनाझ शेख, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक