‘‘आपल्या देशात दर्जात्मक टेनिस स्पर्धाचा अभाव आहे, त्यामुळे ग्रँड स्लॅमसारख्या स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविणारे खेळाडू आपल्याकडे घडत नाहीत,’’ अशी खंत ज्येष्ठ डेव्हिसपटू रमेश कृष्णन यांनी व्यक्त केली. कृष्णन यांनी केलेल्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर भारताने १९८७ मध्ये डेव्हिस चषक स्पर्धेतील अंतिम फेरीत
स्थान मिळविले होते. उपांत्य फेरीत त्यांनी सिडनी येथे ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळविला होता.
देशात अव्वल दर्जाचे खेळाडू का घडत नाहीत, असे विचारले असता कृष्णन म्हणाले, ‘‘आमच्या वेळी जागतिक स्तरावरही भारतीय टेनिस मालिकांना खूप महत्त्व होते. दर तीन-चार महिन्यांनी जागतिक दर्जाची स्पर्धा होत असे. आता अव्वल दर्जाच्या स्पर्धा युरोपात मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. त्याचा फायदा युरोपियन खेळाडूंना होत आहे. तेथील स्पर्धामध्ये भाग घेतल्याखेरीज मानांकनात सुधारणा होत नाही. मात्र, अशा स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी खूप खर्च येतो. अशा स्पर्धा भारतात आयोजित केल्या तर निश्चित भारतीय खेळाडूंना फायदाहोईल.’’
‘‘अन्य खेळांमध्ये जागतिक स्तरावर आपले खेळाडू चमक दाखवीत आहेत. बॅडमिंटनमध्ये आपल्या खेळाडूंनी झपाटय़ाने प्रगती केली आहे, कारण जागतिक दर्जाच्या स्पर्धा मोठय़ा प्रमाणात आपल्याकडे होत आहेत. प्रत्येक खेळाडूला आता भरपूर संघर्ष करावा लागत आहे. टेनिसमध्येही भरपूर मुले-मुली भाग घेत आहेत. मात्र त्यांच्यामधील नैपुण्यवाढीसाठी योग्य पद्धतीने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात अजूनही टेनिस हा खेळ दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू आदी मुख्य शहरांपुरताच मर्यादित राहिला आहे. रांची, धरमशाळा आदी अनेक शहरांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे क्रिकेटचा खूप विकास झाला आहे. टेनिस संघटकांनी तो आदर्श डोळ्यांसमोर ठेवीत प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.’’ असेही कृष्णन यांनी सांगितले.