* भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आज धावांच्या पावसाची अपेक्षा
* वर्षांची विजयी सांगता करण्यासाठी भारत उत्सुक
सतारवादनाची मैफल रंगात आली असतानाच सतारीची तार तुटावी आणि मैफलीचा बेरंग व्हावा, असाच काहीसा अनुभव चेन्नईत येत आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटयुद्धाची रंगत वाढत असतानाच चेन्नईत गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पाऊसधारांमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्याचे भवितव्य अंधारमय झाले आहे.
गेले आठ दिवस चेन्नईत फारसे सूर्यदर्शन झालेले नाही. त्यातच शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे क्रिकेटपटूंबरोबरच चाहत्यांचीही निराशा होण्याची शक्यता आहे. चेन्नईत धावांचा पाऊस होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांनी सामन्यात पावसाचा प्रत्यय येऊ नये, यासाठी देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंना शनिवारी सरावाची संधीच मिळाली नाही. संयोजकांनी खेळपट्टी व त्याच्याजवळील मैदानावर आच्छादन घातले आहे. मैदानात पाणी साठणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली आहे. शुक्रवारी सकाळी खेळपट्टीचीही श्वानपथकाद्वारे तपासणी करण्यात आली होती आणि त्यानंतरच त्यावर आच्छादन घालण्यात आले.
भारताने गतवर्षी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत मोहाली येथे पाकिस्तानला हरविले होते, त्या वेळीही सामन्याच्या आदल्या दिवशी मुसळधार पाऊस झाला होता. मात्र संयोजकांनी अथक परिश्रम घेत हा सामना नेहमीच्या वेळी सुरू होईल असे पाहिले होते. येथेही मैदान कोरडे राहील अशी दक्षता येथील संयोजकांकडून घेतली जात आहे.
पाकिस्तानविरुद्ध पहिला ट्वेन्टी-२० सामना गमावल्यानंतर दोन सामन्यांची मालिका भारत गमावणार काय, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र अहमदाबाद येथील सामना जिंकल्यामुळे व मालिका बरोबरीत राहिल्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये युवराज सिंग याच्यावरच भारताची मुख्य मदार आहे. स्वत: कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने दोन्ही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केल्यामुळे तो समाधानी आहे. मात्र पहिल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हीच भारतापुढील जटिल समस्या आहे. गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग यांच्याकडून भक्कम पाया रचला जावा, अशीच धोनीची अपेक्षा आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यांनीही मोठी धावसंख्या रचण्यात वाटा उचलावा, अशी त्याची अपेक्षा असणार.
गोलंदाजीमध्ये नियमित फिरकी गोलंदाजांनी आतापर्यंत निराशा केल्यामुळे धोनी अडचणीत पडला आहे. येथील खेळपट्टी ‘स्पोर्टिग’ राहील, असा अंदाज असल्यामुळे तीन मध्यमगती गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याकरिता एका फिरकी गोलंदाजाल्ला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
भक्कम पायाभरणी नाही, हीच पाकिस्तानपुढील समस्या असल्यामुळे ट्वेन्टी-२० मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये चमक दाखविणाऱ्या मोहम्मद हाफीझ याला सलामीला पाठविले जाण्याची शक्यता आहे. त्याच्याबरोबरच कर्णधार मिसबाह उल हक, अनुभवी युनूस खान, कामरान अकमल यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजीची मुख्य मदार आहे. मिसबाह व युनूस हे नेहमीच भारताविरुद्धच्या सामन्यात चांगली फलंदाजी करतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
द्रुतगती गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपेक्षेइतकी आक्रमक खेळी करू शकत नाही, हे लक्षात घेऊनच येथील सामन्यात उमर गुल व रियाज वहाब यांच्याबरोबरच युवा खेळाडू अन्वर अली या द्रुतगती गोलंदाजास वनडे पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. पाचवा गोलंदाज म्हणून त्याला स्थान देण्यासाठी नासीर जमशेद व इम्रान फरहात यांच्यापैकी एका फलंदाजाला विश्रांती दिली जाईल, असा अंदाज आहे.
रक्षकांची कमाल!
खेळपट्टीचे नुकसान कोणी करू नये, यासाठी मैदानावरही पहारा ठेवण्यात आला आहे. धो-धो पाऊस सुरू असतानाही आठ ते दहा पोलीस हातात छत्री घेऊन अनेक तास उभे राहूनच पहारा देत आहेत. त्यांच्यासाठी खुर्चीची सुविधा असली तरी त्यावर पाणी असल्यामुळे उभे राहणेच त्यांनी पसंत केले.
 प्रतिस्पर्धी संघ :
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, अशोक िदडा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा.
पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), नासीर जमशेद, इम्रान फरहात, मोहम्मद हाफीझ, उमर अकमल, युनूस खान, कामरान अकमल, रियाज वहाब, उमर गुल, अन्वर अली, सईद अजमल, हरीस सोहेल, जुनेद अली, अजहर अली, झुल्फिकार बाबर.
सामन्याची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून,
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार स्पोर्ट्स.    
चेपॉकला युद्धभूमीचे स्वरूप!
भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच तणावपूर्ण वातावरणात खेळले जातात. येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चेपॉक स्टेडियमच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्टेडियमची क्षमता जवळजवळ ४५ हजार प्रेक्षकांची असल्यामुळे प्रत्येक दाराजवळ धातुशोधक यंत्राबरोबरच श्वानपथकेही ठेवण्यात आली आहेत. प्रेक्षकांनी कोणत्या वस्तू आणाव्यात यावरही मोठय़ा प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. आठ हजारपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.