वानखेडे स्टेडियमवरील भारत-इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडने भारताचा तब्बल १० विकेट्स राखून पराभव करत कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजांनीही इंग्लंडच्या संघासमोर नांगी टाकल्याने भारतीय संघावर मायदेशी पराभवाची नामुष्की ओढवली आहे. विजयासाठी केवळ ५७ धावांचे आव्‍हान घेऊन उतरलेल्‍या इग्‍लंडच्‍या सलामीवीरांनी भारतीय फिरकीपटुंवर हल्‍ला चढवत विजयाची औपचारीकता पूर्ण केली. आज (सोमवार) सकाळी भारताचा दुसरा डाव १४२ धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने एकही गडी न गमावता विजयासाठी समोर असलेले ५७ धावांचे आव्हान सहजरित्या पूर्ण करत दुसरी कसोटी आपल्या खिशात घातली.
आज सकाळी फलंदाजीला मैदानात उतरलेल्या हरभजनला स्वानने स्लीपमध्ये झेलबाद करत भारताला आठवा धक्का दिला. त्यानंतर झहीर खान अवघी एक धाव काढून तंबूत परतला. त्यानंतर शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिलेल्या गौतम गंभीरला स्वानने पायचीत करत भारताचा डाव १४२ धावांत गुंडाळला. इंग्लंडकडून पानेसरने ६ आणि स्वानने चार गडी बाद केले. इंग्लंडकडून फलंदाजीला उतरलेल्या संघातील कुकने १८ आणि कॉम्पटनने ३० धावा करत दहा गडी राखून भारतावर विजय मिळविला.