न्यूझीलंडविरुद्धची कोलकातामध्ये होणारी दुसरी कसोटी जिंकल्यास भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचण्याची नामी संधी असेल.

सध्याच्या घडीला या क्रमवारीमध्ये पाकिस्तान १११ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारताकडे ११० गुण आहेत. त्यामुळे कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील सामना जिंकत भारताला क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची नामी संधी असेल.

पाचशेव्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात  फिरकीपटू आर. अश्विनने १० बळी मिळवले होते. या कामगिरीने अश्विनच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे. या दमदार कामगिरीमुळे अश्विनच्या खात्यावर आता एकूण ८७१ गुण झाले आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनने ४० धावा केल्या होत्या. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत त्याने अव्वल स्थान कायम राखले असून त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा ४५० गुणांची कमाई केली आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या डावात विल्यमसनने ७५ , तर दुसऱ्या डावात २५ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आहे.

या सामन्यात मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार फलंदाजी केली होती. या दोघांनीही कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत संयुक्तरीत्या १६वे स्थान पटकावले आहे.