भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर लोकेश राहुल दिवसेंदिवस आपलं स्थान संघात पक्क करत चालला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत लोकेश राहुलने ८५ धाावांची खेळी केली. आजच्या खेळीत त्याने शिखर धवनसोबत शतकी भागीदारीही केली. या खेळीदरम्यान लोकेश राहुलच शतक १५ धावांनी हुकलं, मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सलग ७ अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या ६ डावांमध्ये राहुलने ९०, ५१, ६७, ६०, ५१* अशी धावसंख्या उभारलेली आहे. या आगळ्या वेगळ्या विक्रमामुळे लोकेश राहुलला एव्हरटॉन विक्स, अँडी फ्लॉवर, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा, खिर्स रॉजर्स यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत मानाचं स्थान मिळालं आहे. ही कामगिरी करणारा राहुल हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने राहुलवर टाकलेला विश्वास त्याने आपल्या खेळीतून सार्थ करुन दाखवला आहे. कित्येक सामन्यांमध्ये दुखापत असतानाही तो सामना खेळलेला आहे. गेल्या काही वर्षात भारत कसोटी सामने हे आपल्या घरच्या मैदानावर खेळला आहे. श्रीलंकेचा दौरा हा भारतीय संघाचा दीर्घ कालावधीनंतरचा पहिला परदेश दौरा असणार आहे. यानंतर २०१८ साली जानेवारी महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारताच्या सलामीवीराची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे राहुलही आपली फलंदाजी सुधारण्यासाठी श्रीलंकेत वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहे.

त्यामुळे आगामी काळात लोकेश राहुलच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.