धर्मशाला येथे शनिवारपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली खेळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. तो अद्यापही तसाच कायम आहे. कारण खुद्द विराट कोहलीनेही धर्मशाला कसोटीत खेळण्याबाबत पूर्ण शाश्वती दिलेली नाही. धर्मशाला कसोटीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला त्याच्या उजव्या खांद्याला झालेली दुखापत आणि कसोटीतील समावेशाबाबत विचारण्यात आले. कोहली म्हणाला की, ”संघात एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असेल तर त्याचा समावेश संघात केला जाऊ की नये याबाबत जो निर्णय घेण्यात येतो. तो माझ्याही बाबतीत लागू पडतो. संघातील कोणत्याही खेळाडूला इतरांपेक्षा काही वेगळी वागणूक दिली जात नाही किंवा झुकतं माप ठेवले जात नाही. मी जर फिटनेस टेस्टमध्ये शंभर टक्के फिट असेन तरच मी चौथी कसोटी खेळेन.”

 

रांची कसोटीत सीमारेषेवर चौकार अडवाताना कोहलीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर कोहलीला मैदानावर क्षेत्ररक्षण करता आले नव्हते. कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्त्व केले. दुसऱया डावात कोहली फलंदाजीसाठी उतरला पण तो स्वस्तात माघारी परतला होता. त्यामुळे कोहली दुखापतीतून अद्यापही पूर्णपणे सावरलेला नाही. कसोटीच्या तयारीसाठी आयोजित सराव सत्रात कोहली सहभागी झाला, मात्र त्याने फलंदाजी केली नाही. विराटच्या तंदुरुस्तीविषयी साशंकता असल्याने मुंबईकर श्रेयस अय्यरला पाचारण करण्यात आले. त्यामुळे कोहलीच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ‘विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया’ असे स्वरूप प्राप्त झाले आहे. मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने धरमशाला कसोटी जिंकणे दोघांसाठी क्रमप्राप्त आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या शाब्दिक चकमकींना जशास तसे प्रत्युत्तर देणारा कोहली संघात नसणे भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे.