भारतीय संघाचा सलामीवीर मुरली विजय याने आयसीसीचे पंच ख्रिस ब्रॉड यांनी पुण्याच्या खेळपट्टीला दिलेला ‘लाल शेरा’ फेटाळून लावला आहे. पुण्याची खेळपट्टी दोषी म्हणण्याऐवजी आव्हानात्मक होती असे म्हणावे लागेल. खेळपट्टीवर टीकून राहण्यास आम्ही अपयशी ठरलो आणि पराभव पत्करावा लागला, असे मुरली विजय म्हणाला.

भारतीय संघ येत्या शनिवारपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार सराव करत असून मालिकेतील आव्हान कामय ठेवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावा लागणार आहे. मुरली विजय म्हणाला की, पुण्याची खेळपट्टी दोषयुक्त नव्हती. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून पुण्याची खेळपट्टी आव्हानात्मक होती. एक क्रिकेटपटू म्हणून नेहमी पाटा खेळपट्ट्यांवर खेळण्याऐवजी अशा खेळपट्टीवर चांगली फलंदाजी आम्हाला करायलाच हवी. फलंदाजी तंत्र आणि कौशल्याची परीक्षा घेणाऱया खेळपट्ट्यांच्या आव्हानाला सामोरे जाणे नेहमी चांगले असते, असेही तो पुढे म्हणाला.

 

पुण्याच्या कसोटीत भारतीय संघाला तब्बल ३३३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारतीय संघाचे दोन्ही डाव अनुक्रमे १०५ आणि १०७ धावांत संपुष्टात आले होते. तिसऱयाच दिवशी कसोटीचा निकाल लागला होता. मात्र, कसोटीनंतर खेळपट्टीचे परीक्षण केले असता सामन्याचे पंच ख्रिस ब्रॉड यांनी खेळपट्टी दोषयुक्त असल्याचा अहवाल आयसीसीला दिला. याशिवाय, खेळपट्टीबाबत देण्यात आलेल्या अहवालावर प्रतिक्रियेसाठी बीसीसीआयला १५ दिवसांचा कालावधी देखील देण्यात आला आहे.