पुण्यातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारली. तब्बल १९ कसोटी सामने जिंकलेल्या भारतीय संघाला अखेर पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा विजय हा गेल्या १३ वर्षांतील भारतीय भूमीवरील पहिलाच कसोटी विजय ठरला आहे.

पुण्यातील कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने ३३३ धावांनी दणदणीत पराभव केला. सामन्याच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली. त्यांच्या फिरकी माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. अवघ्या १०५ धावांत भारताचा डाव गुंडाळला. दुसऱ्या डावात फिरकीला अनुकूल असलेल्या पीचवर टिच्चून फलंदाजी करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर होते. ते आव्हान त्यांनी सहज पेलले. सुरुवातीला झुंजणाऱ्या कर्णधार स्मिथने शतकी खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ठेवलेले ४४१ धावांचे आव्हान पार करताना भारताची फलंदाजी ढेपाळली. अवघ्या १०७ धावांत भारताचा खुर्दा झाला. भारताने दोन्ही डावांत एकूण २१२ धावा केल्या. पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात १०७ केल्या. हा भारताचा निचांक आहे. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाने भारताची विजयी मालिका संपुष्टात आली. तब्बल १९ सामन्यांनंतर भारताला पराभवाची चव चाखावी लागली. हैदराबादमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताने बांगलादेश संघावर विजय मिळवला होता. या विजयानंतर विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. विराटने माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या १८ सामने अपराजित राहण्याचा विक्रम मोडला होता. ही विजयी मालिका विराट पुढे चालूच ठेवणार, असे वाटत असतानाच पुण्यातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी दोन वर्षांपू्र्वी श्रीलंकेविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.

कर्णधार स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने पुणे कसोटी जिंकून आपली पराभवाची मालिका खंडीत केली. गेल्या ११ कसोटींमध्ये ९ सामन्यांत पराभव स्वीकारावे लागलेल्या ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून सरस कामगिरी केली आहे. गेल्या तेरा वर्षांतील भारतीय भूमीत मिळवलेला हा पहिलाच कसोटी विजय आहे. यापूर्वी २००४ साली नागपूरमधील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला होता. दरम्यान ‘रन मशिन’ समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीला पुणे कसोटी सामन्यात कर्णधाराला साजेसा खेळ करता आलेला नाही. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत त्याने अवघ्या १३ धावा केल्या. पहिल्या डावात तर शून्यावरच बाद झाला होता. मायदेशात आजवर खेळल्या गेलेल्या सामन्यांपैकी त्याने केलेली ही सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.