बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताला मोठा हादरा बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे या सामन्याला मुकला आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. तर विराटऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले आहे.

रांची कसोटीत सीमारेषेवर चौकार अडवाताना कोहलीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर कोहलीला मैदानावर क्षेत्ररक्षण करता आले नव्हते. चौथ्या कसोटीत कोहली खेळणार की नाही याविषयी संभ्रमाचे वातावरण होते. संघात आक्रमकता रुजवणारा संघनायक कोहली दुखापतीमुळे १०० टक्के तंदुरुस्त नसल्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली होती. कोहलीने शुक्रवारी नेट्समध्ये फलंदाजीचा कसून सराव केला. मात्र त्याच्या खेळण्याविषयी अनिश्चितता कायम होती. ‘‘तंदुरुस्ती चाचणीचा निर्णय अनुकूल ठरला, तर मला मैदानावर उतरता येईल. याबाबत जोखीम कितपत असेल, हे फिजिओच योग्य पद्धतीने सांगू शकतील,’’ असे कोहलीने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र कोहली अनफिट असल्याने त्याला माघार घ्यावी लागली. शनिवारी सुरु झालेल्या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला आहे. निर्णायक कसोटीत भारताला विजय मिळवून देत अजिंक्य रहाणेला नेतृत्वगूण सिद्ध करण्याची संधी आहे.

दरम्यान, विराट कोहलीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून  मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र अय्यरऐवजी कुलदीपला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात पाच गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. खेळपट्टी बघून आम्ही संघात पाच गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या सत्रात आम्हाला विकेट मिळणे गरजेचे आहे असे त्याने अजिंक्य रहाणेने सांगितले. कुलदीप यादव हा डावखूरा फिरकी गोलंदाज आहे.