पहिल्या वन-डेत हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर अॅडम झम्पाची चांगलीच धुलाई केली. हार्दिकने लगावलेल्या सलग ३ षटकारांवर झम्पाने पांड्याचे कौतुक केलं. हार्दिक पांड्या खूपच चांगला फलंदाज असल्याचे तो म्हणाला. पहिल्या वन-डेतील ढिसाळ कामगिरीनंतर झम्पा म्हणाला की, दबाव असताना चांगली कामगिरी करण्याची माझ्यात क्षमता आहे. त्याबद्दल मला स्वत:चा अभिमान वाटतो. पण पहिल्या वन-डेत हार्दिक पांड्याविरुद्ध मैदानात माझी क्षमता सिद्ध करु शकलो नाही. भारत दबावात असताना मी अपयशी ठरलो. पांड्याला नेहमीच्या शैलीत गोलंदाजी करु शकलो नाही. जर पांड्यासारख्या फंलदाजाला अचूक मारा केला नाही, तर चेंडू मैदानाच्या बाहेरच जाणार, असेही त्याने यावेळी म्हटले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अवघ्या ८७ धावांवर ५ गडी बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला. त्यानंतर त्याने धोनीसोबत भारताच्या डावाला आकार दिला. ३७ व्या षटकात पांड्याने झम्पाचा चांगलाच समाचार घेतला. एका चौकारासह सलग ३ षटकार खेचून त्याने या षटकात २४ धावा घेतल्या. यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने चेन्नईच्या पहिल्या वन-डेत विजयी सलामी दिली. या सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने २६ धावांनी विजय मिळवला होता. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर धोनीने अष्टपैलू हार्दिक पांड्यासोबत चांगला खेळ करत भारताचा डाव सावरला. सामन्यानंतर पांड्या म्हणाला होता की, आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर धोनीने २३० धावांचे लक्ष ठेवून खेळायला सांगितले. त्यावेळी मी २८० पर्यंत पोहोचू, असे म्हटले होते.