सारे कामधाम विसरून अवघा देश गुरुवारी सकाळपासून दूरचित्रवाणीसंचांसमोर ठाण मांडून बसला होता. रस्ते सुने होते, लोकल गाडय़ा विनागर्दी धावत होत्या. कचेऱ्यांतील काम बंद पडले होते. डॉक्टरांनी शल्यकर्मेही पुढे ढकलली होती. सर्वाना आशा होती भारताच्या विजयाची. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत जाणार हा भरवसा तर सट्टेबाजांनीही दिला होता. त्यामुळे अनेकांना विजयाची खात्रीच होती. परंतु हे आशाअपेक्षांचे पीक ऑस्ट्रेलियाने केलेल्या गारपिटीने मातीमोल झाले.. विश्वचषकाचा ‘मौका’ हातातून गेला.
सांघिक कामगिरी आणि भावनांपेक्षा व्यावसायिकतेला प्राधान्य देणारा खेळ या गुणवैशिष्टय़ांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा विजयरथ रोखला. उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने स्टिव्हन स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ३२८ धावांचा डोंगर उभारला.
एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम फिनिशर असलेल्या महेंद्रसिंग धोनीने ६५ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र दुसऱ्या बाजूने नियमित अंतरात सहकारी बाद होत गेल्याने धोनीची झुंज अपयशी ठरली आणि त्यानंतर सुरू झाला चाहत्यांच्या शोक-संतापाचा खेळ..