भारताने तिसरी कसोटी डावाने गमावली आणि मालिकासुद्धा. परंतु संघातील कोणाच्याही चेहऱ्यावर ना खेद, ना खंत? भले आम्ही मालिका गमावली असेल, परंतु तीन वर्षांपूर्वीसारखी ४-० अशी नाही. पहिली कसोटी अनिर्णीत राखली आणि दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवला, या दोनच सकारात्मक गोष्टींचे भांडवल महेंद्रसिंग धोनीच्या संघाला आत्मिक समाधान देण्यास पुरेसे ठरले. त्यामुळेच उर्वरित तीन कसोटी सामन्यांत भारताने मानहानीकारक पराभव पत्करल्याचे शल्य कुणालाही बोचत नव्हते. भारताने इंग्लंडविरुद्धची सलग तिसरी कसोटी मालिका गमावली आहे. २०११मध्ये भारतीय संघाने सपाटून मार खाल्ल्यानंतर पुढील वर्षी इंग्लंडने भारतात येऊन २-१ अशा फरकाने मालिका जिंकण्याचा पराक्रम करून खवला होता. पण दुसऱ्या कसोटीअखेरीस १-० अशी आघाडी घेणारा भारतीय संघ ३-१ अशा पद्धतीने हार पत्करेल असे कुणालाही वाटले नव्हते. नेमक्या याच कालखंडात भारतीय महिला संघाने मात्र इंग्लिश भूमीवर तब्बल आठ वर्षांनी झालेली एकमेव सामन्याची कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. ही खरे तर त्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली, परंतु त्यांना शाबासकी देण्यासाठी श्रीमंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तिजोरीत ना पैसे आहेत, ना कौतुकाचे शब्द. भारताच्या पुरुष संघासाठी अस्तित्वात असलेला श्रेणीनिहाय मानधनाचा वार्षिक करार महिलांसाठी उपलब्ध नाही. इथे मात्र वर्षभर भारतीय क्रिकेटपटू सामने खेळा आणि पैसे कमवा, हे धोरण जपत आहेत. एके काळी इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटला विलक्षण महत्त्व होते. त्या वेळी भारताच्या कोणत्याही खेळाडूला काऊंटी संघातर्फे खेळायची संधी मिळाली की त्याच्याकडे कौतुकाने पाहिले जायचे. इंग्लिश वातावरण, खेळपट्टय़ा यांचा अभ्यास या निमित्ताने व्हायचा. परंतु आता भारतीय क्रिकेटपटूंचे दोन महिने आयपीएलमध्ये आणि एक महिना चॅम्पियन्स लीगमध्ये खर्ची जातो. मग काऊंटी खेळायला वेळ आहे कुणाला? भारतीय क्रिकेटपटूंनी आयपीएल खेळणे टाळावे का, हा प्रश्न मालिका गमावल्यानंतर धोनीला जेव्हा विचारण्यात आला, तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ‘‘आयपीएलचा द्वेष करू नका. हा प्रश्न तुम्ही बीसीसीआयला विचारा,’’ असा सल्ला धोनीने प्रसारमाध्यमांना दिला. चौथी कसोटी तीन दिवसांत संपल्यानंतर आता दोन दिवस अतिरिक्त विश्रांतीचे मिळणार आहेत, असे मत व्यक्त धोनी टीकेचा धनी झाला होता. परंतु दोन दिवस अतिरिक्त विश्रांती त्याने अखेरच्या कसोटीतसुद्धा पदरात पाडून घेतली आहे.
पहिल्याच कसोटी सामन्यात जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात झालेल्या वादंगाचे दडपण संपूर्ण मालिकेत जाणवत होते. कप्तान धोनीसहित भारतीय संघ जडेजाच्या पाठीशी होता, परंतु बीसीसीआयवरून पायउतार झाले तरी त्यावर नियंत्रण असणारे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आर्थिक नाडय़ा ताब्यात ठेवणारे एन. श्रीनिवासन आणि मंडळींनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. उलट ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ हे धोरण स्वीकारण्यात धन्यता मानली. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या त्रिराष्ट्रांचीच सध्या जागतिक क्रिकेटवर सत्ता आहे. त्यामुळे अँडरसनवर कारवाई करून इंग्लंडला दुखावण्याचे श्रीनिवासन यांनी प्रकर्षांने टाळले.
भारताच्या कामगिरीचा वेध घेतल्यास अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या वेगवान आणि स्विंग माऱ्यासमोर भारताची भंबेरी उडाल्याचे चित्र अखेरच्या तीन कसोटी सामन्यांत वारंवार दिसले. भारतीय फलंदाजांचे तंत्र हे गोंधळल्यासारखेच जाणवत होते. भारताचे शेवटचे पाच डाव १७८, १५२, १६१, १४८ आणि ९४ धावांत संपुष्टात आले. याप्रमाणे मालिकेतील १० डावांपैकी ७ डावांमध्ये भारताला दोनशे धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. हे दुर्दैवाचे दशावतार खचलेल्या मानसिकतेचेच प्रतीक होते. त्या तुलनेत इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत ७ बाद ५६९ आणि ४ बाद २०५ धावा केल्या, तर चौथ्या आणि पाचव्या कसोटीतील अनुक्रमे ३६७ आणि ४८६ या धावसंख्या भारताला दोन डाव फलंदाजी करूनसुद्धा भारी पडल्या. मुरली विजय, धोनी आणि अजिंक्य रहाणे सोडल्यास अन्य बाकी फलंदाजांना इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेता आले नाही. भुवनेश्वर कुमारने मात्र आपल्या अष्टपैलू कामगिरीने आपली छाप पाडली.
दोन वर्षांपूर्वी जेव्हा इंग्लिश संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा ग्रॅमी स्वान आणि मॉन्टी पनेसार या फिरकी गोलंदाजांच्या बळावर इंग्लंडने फिरकीच्या नंदनवनात येऊन वर्चस्व प्राप्त केले होते. त्या वेळी स्वानच्या खात्यावर २० आणि पनेसारच्या १७ बळी जमा होते. हे दोघेही नसताना कामचलाऊ फिरकीपटू मोईन अलीकडे भारतीय फलंदाजांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच त्याला १९ बळी मिळाले. त्या तुलनेत भारतीय फिरकी गोलंदाज मात्र चाचपडतानाच आढळत होते. भारताचे स्लिपमधील क्षेत्ररक्षण अतिशय गचाळ दर्जाचे झाले. पाच कसोटी सामन्यांमध्ये सुमारे डझनभर झेल सोडून भारतीय क्षेत्ररक्षकांनी पाचशेहून अधिक अतिरिक्त धावा इंग्लिश फलंदाजांना भेट दिल्या.
तूर्तास, प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी नेमके काय मार्गदर्शन केले, याचे शल्यविच्छेदन जसे सुरू आहे. तसेच धोनीने कसोटी कर्णधारपद सोडावे का, ही चर्चासुद्धा पुन्हा रंगात आली आहे. परंतु सध्या तरी याबाबत कोणतेही बदल पाहायला मिळण्याची शक्यता दिसत नाही. जून महिन्यात श्रीलंकेच्या संघाने इंग्लिश भूमीवर कसोटी मालिका जिंकून दाखवली, भारताच्या महिला संघानेही इंग्लंडमध्ये यश मिळवून दाखवले, परंतु जगज्जेतेपद नावावर असलेल्या भारताच्या पुरुष संघाला ते जमले नाही. कारण परदेशातील कसोटी मालिकेला सामोरे जाताना भारतीय संघातील खेळाडूंची शेंदाड शिपायांसारखी अवस्था होते.