इंग्लंडविरुद्धच्या कटक येथे खेळविल्या जाणाऱया दुसऱया एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. इंग्लंडला या सामन्यातही धूळ चारून विराट आर्मी मालिका खिशात घालण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय संघ या सामन्यात विजय प्राप्त करून मालिका जिंकण्यासोबतच संघातील खेळाडू काही विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. कटक सामन्यात पुढील विक्रम मोडीत निघू शकतात

१. कटक सामन्यात महेंद्रसिंग धोनीने १०६ धावांची खेळी साकारली तर तो वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याचा ९,२२१ धावांचा विक्रम मोडीस काढेल. धोनीने असे केल्यास सर्वाधिक धावा करणाऱयांच्या यादीत धोनी १६ व्या स्थानी पोहोचेल.

२. विराट कोहलीने पहिल्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात शतकी कामगिरी केल्यास श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसुर्या याच्या २८ शतकांच्या विक्रमाशी तो बरोबरी करू शकेल. कोहलीने आपले २८ वे शतक ठोकले, तर सर्वाधिक शतक ठोकणाऱयांच्या यादीत तो तिसऱया स्थानावर पोहोचेल.

३. धोनीने कटकमधील सामन्यात ४ षटकार ठोकले, तर न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रॅण्डन मॅक्क्युलमच्या सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मोडू शकेल. मॅक्क्युलमने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये २०० षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता.

४. तर युवराज सिंग क्रिकेट करिअरमधील १५० षटकारांचा आकडा गाठण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.

५. रवींद्र जडेजाला कटक सामन्यात दोन विकेट्स घेऊन बळींचा १५० चा आकडा गाठण्याची संधी असणार आहे.