चीनमध्ये पुढील आठवडय़ात होणाऱ्या आशियाई मैदानी स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू तीन दिवसांनी रवाना होणार आहेत, मात्र किमान दहा खेळाडूंची अद्याप उत्तेजक चाचणी झालेली नाही.
ही स्पर्धा ३ जूनपासून सुरू होत असून भारतीय खेळाडू ३० मे रोजी चीनला जाणार आहेत. मात्र या संघातील किमान दहा खेळाडूंची उत्तेजक चाचणी झालेली नाही. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) वीस खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत. तसेच पुरुष व महिलांच्या
रिले संघातील खेळाडूंची नावे लवकरच निश्चित होणार आहेत. रिले संघाची निवड चाचणी अनुक्रमे पतियाळा व बंगळुरू येथे बुधवारी होणार आहे. या चाचणीनंतर लगेचच त्यांची उत्तेजक चाचणी घेण्याचे आदेश अ‍ॅथलेटिक्स महासंघाने राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीला (नाडा) दिले आहेत.
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (वाडा) एका पथकाने नुकतीच तिरुवअनंतपुरम येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणास आकस्मिक भेट दिली होती. त्या वेळी काही खेळाडूंनी उत्तेजक चाचणी टाळण्यासाठी तेथून पलायन केले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार तेथे महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीकरिता खेळाडूंची निवड केली जाणार होती, मात्र त्याऐवजी ही चाचणी आता पतियाळा येथे घेण्याचा निर्णय एएफआयने घेतला आहे.
उत्तेजक चाचणी टाळण्यासाठीच या खेळाडूंनी पलायन केले आहे. भारतीय संघ चीनला रवाना होण्यापूर्वी उत्तेजक चाचणीचा अहवाल मिळणार काय, असे विचारले असता एएफआयचे चिटणीस सी. के. वॉल्सन यांनी सांगितले, आम्ही नाडा संस्थेला या चाचणीचे अहवाल ३६ तासांत द्यावेत, अशी विनंती केली आहे.