आज सनरायझर्स हैदराबादशी सामना

रविवारी कोलकाता नाइट रायडर्सविद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुवर या लीगमधील नीचांकी धावसंख्या नोंदवण्याची नामुष्की ओढवली होती. पण फिनिक्स पक्षी जसा राखेतून भरारी घेतो तशी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुच्या संघाला घेता येईल का, हा प्रश्न क्रिकेटचाहत्यांच्या मनात आहे. मंगळवारी आपल्या घरच्या मैदानात त्यांचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यात बेंगळुरुच्या फलंदाजीवर साऱ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल.

कोहली, एबी डी’व्हिलियर्स आणि ख्रिस गेलसारखे महान फलंदाज संघात असूनही बेंगळुरुला फक्त ४९ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे यापुढच्या सामन्यांसाठी बेंगळुरुच्या संघाला फलंदाजीवर कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. कोहलीसह अन्य फलंदाज या सामन्यात कसे पेटून उठतात हे पाहणे साऱ्यांसाठी उत्सुकतेचे असेल. गोलंदाजीमध्ये बेंगळुरुच्या सॅम्युअल बद्री आणि युजवेंद्र चहल यांनी आतापर्यंत सातत्याने भेदक मारा केला आहे. वेगवान गोलंदाज टायमल मिल्सही सध्याच्या चांगल्या फॉर्मात आहे.

हैदराबादची आतापर्यंत कामगिरी चांगली झाली आहे. त्यांनी कामगिरीत सातत्य राखले आहे. गेल्या सामन्यात त्यांना रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण त्यापूर्वी त्यांनी चार सामने जिंकले होते. त्यामुळे पुण्याविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा विजयाच्या वाटेवर येण्यासाठी हैदराबादचा संघ उत्सुक असेल. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत दमदार फलंदाजी केली आहे. मोइसेस हेन्रिस्कही सातत्याने अष्टपैलू कामगिरी करत आहे. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार आणि रशिद खान यांनी आतापर्यंत भेदक मारा केला आहे.

सध्याचा फॉर्म पाहता बेंगळुरुपेक्षा हैदराबादचा संघ उजवा वाटतो. त्यामुळे हा सामना जिंकण्याची जास्त संधी हैदराबादला असेल, पण जर गेल्या सामन्यातील पराभवानंतर बेंगळुरुचा संघ त्वेषाने मैदानात उतरला तर त्यांना विजय मिळवता येऊ शकेल.

  • वेळ : रात्री ८.०० वा. पासून.
  • थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स आणि सोनी इएसपीएन वाहिन्यांवर.