वानखेडे स्टेडियमवर आजमितीपर्यंत झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सामन्यांना क्रिकेटरसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या मैदानावर झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी क्रिकेटरसिकांनी आवर्जून हजेरी लावली तरी आयपीएलची लज्जत आणि तडक्याचा अभाव मात्र जाणवत होता. या सामन्याला सुमारे २६ हजार क्रिकेटरसिक उपस्थित असल्याचे एमसीएच्या सूत्रांनी सांगितले.
आयपीएलच्या सामन्यांसाठी किमान तिकीट दर आठशे रुपये असूनही क्रिकेटरसिक तो सामना हाऊसफुल्ल करतात, हे चित्र वानखेडेवर नेहमीच दिसते, पण वानखेडेवर ट्वेन्टी-२० सामन्याचे किमान तिकीट दर तीनशे रुपये असतानाही क्रिकेटरसिकांना तिकीट खिडकीचे आकर्षण वाटले नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने आधी या सामन्याची तिकीट विक्री फक्त ऑनलाइन पद्धतीने होईल असे जाहीर केले होते, पण ऑनलाइन तिकिटांना अपेक्षित प्रतिसाद न लाभल्यामुळे शुक्रवारी दुपारी मुंबई हॉकी असोसिएशनबाहेरील काउंटरवर तिकीट विक्री सुरू करण्यात आली, पण क्रिकेटरसिकांचा लाडका फलंदाज सचिन तेंडुलकर नसल्यामुळे असेल किंवा भारताच्या सध्याच्या अपयशी कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी तिकीट विक्रीला तूरळक प्रतिसाद मिळाला.
शनिवारीही तिकीट खिडकी चालू होती. या खिडकीवर तीनशे रुपयांचे तिकीट संपल्याचे फलक लावले असले तरी ७५० रुपयांचे तिकीट मात्र उपलब्ध होते. याशिवाय तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्यांचा धंदाही मंदीत होता. ही मंडळी तीनशे रुपयांचे तिकीट शेवटी तीनशे रुपयांनाही द्यायला तयार होती. सायंकाळी ७ वाजता सामना सुरू झाला, तेव्हा अध्रे स्टेडियम रिकामे होते. मात्र सुरक्षा तपासणीमुळे क्रिकेटरसिकांना स्टेडियमच्या आत पोहोचण्यास प्रचंड दिरंगाई होत होती. सामना सुरू होऊन अर्धा तास झाला तरी क्रिकेटरसिकांचे आतमध्ये येणे चालूच होते, पण त्यानंतर मात्र स्टेडियम भरल्याचे सहज जाणवत होते. एमसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सामन्याची ९५ टक्के तिकीट विक्री झाली असून, क्रिकेटरसिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.
भारताचे तिरंगी ध्वज आणि चौकार-षटकांचे फलक घेऊन आलेले क्रिकेटरसिक वातावरणात उत्साह निर्माण करीत होते, मात्र आयपीएलचा जोश जसा वानखेडेवर दिसत नव्हता, तशीच चीअरगर्ल्सची थिरकणारी पावले, बॉलीवूडच्या तारे-तारकांचा तडका आणि ढोलताशा-डीजे आदींच्या अभावामुळे या ट्वेन्टी-२० सामन्याला आयपीएलची रंजकता नव्हती.