गौतम गंभीर आणि रॉबीन उथप्पा यांच्या तुफान फटकेबाजीसमोर रायझिंग पुणे सुपरजाएट्ंसचे १८३ धावांचे लक्ष्य देखील ठेंगणे ठरले. गंभीर, उथप्पाने पुण्याच्या गोलंदाजांचा समाचार घेत १५८ धावांची भागीदारी रचली. कोलकात्याने पुण्यावर ७ विकेट्सने दणदणीत विजय साजरा केला. पुण्याची गोलंदाजी यावेळी पूर्णपणे भरकटली. याचाच फायदा घेत गंभीर, उथप्पाने गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. गंभीरने ४६ चेंडूत ६२ धावांची खेळी साकारली, तर रॉबीन उथप्पाने ४७ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. उथप्पाने स्टेडियमच्या चहुबाजूंना तब्बल ६ षटकार आणि सात खणखणीत चौकार लगावले.  गौतम गंभीरच्या संघाने सामना अतिशय सहजरित्या जिंकून कामगिरीतील सातत्य दाखवून दिले आहे. पुण्याकडून इम्रान ताहीर याने चार षटकात सर्वाधिक ४८ धावा दिल्या.

तत्पूर्वी, कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजाएंट्सने  १८३ धावांपर्यंत मजल मारली होती.  रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा केवळ ४९ धावांत खुर्दा उडवणाऱ्या कोलकाताने आज टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पुण्याकडून सलामीजोडी त्रिपाठी आणि रहाणेने चांगली सुरूवात केली होती. दोघांनी ६५ धावांची भागीदारी रचून पाया रचला. पुढे धोनीनेही चांगली फटकेबाजी केली. पण तो मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. धोनीने ११ चेंडूत २३ धावा ठोकल्या. यात दोन खणखणीत षटकारांचा समावेश होता. धोनी बाद झाल्यानंतर दुसऱ्याबाजूने स्मिथने फटकेबाजी सुरू ठेवत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानात टिच्चून फलंदाजी करत संघाला वीस षटकांच्या अखेरीस १८३ धावांपर्यंत पोहोचवले. कोलकाताकडून कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव, सुनील नरेन आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.