धावपटू कविता राऊत व्हिवा लाऊंजच्या व्यासपीठावर

धावणं सामान्यांना दमवतं. मात्र धावणं तिचा ध्यास आहे. वर्षभराच्या बैठय़ा जीवनशैलीत बदल म्हणून वर्षांतला एक दिवस मॅरेथॉनच्या निमित्ताने जिवाची मुंबई करण्याची पद्धत रूढ झाली आहे. मात्र नाशिकजवळच्या सावरपाडय़ातील कवितासाठी धावणं हेच आयुष्य आहे. अध्र्या तासावर असणाऱ्या शाळेत जाण्यासाठीची पळापळ नंतर कविताच्या कारकिर्दीचा भाग झाला. महानगरातील मॅरेथॉन शर्यतींपूर्वी महिनाभर आधी वातावरणनिर्मिती केली जाते. या जत्रोत्सवापासून कविता भौगौलिकदृष्टय़ा आणि मनानेही दूर असते. पण तिचा जिंकण्याचा निश्चय पक्का असतो. ती येते, स्पर्धा जिंकते आणि नव्या शर्यतीसाठी तिची तयारी सुरूही होते. व्यावसायिक घोटीवपण ही जगातले अव्वल क्रीडापटू आणि संघांची ओळख. दहा वर्षांहून अधिक काळ अ‍ॅथलेटिक्ससारख्या दुर्लक्षित खेळात कारकीर्द घडवणाऱ्या कविताला ही विशेषणं लागू होतात, यातच तिचं मोठेपण दडलं आहे. खाचखळग्यांचा प्रवास उलगडण्यासाठी कविता रविवारी केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाऊंजच्या व्यासपीठावर येणार आहे.

विभिन्न वातावरण, रस्ते, दुखापती या सगळ्यांतून शर्यत जिंकणे अवघडच पण कविताने गेली अनेक वर्षेजिंकण्याचा शिरस्ता जपला आहे. स्वत:च्या नावाचा ब्रॅण्ड झाल्यावर पैसा, प्रसिद्धी, सोयीसुविधा चालून येतात. मात्र सुरुवात ‘एकला चलो रे’ असते. कविता याला अपवाद नव्हती. उपजत कौशल्याला मेहनतीची जोड देत कविताने साकारलेलं यश युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी.

२०१०मध्ये राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कविताने १०,००० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले. त्याच वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत पदकाचा रंग बदलत रौप्यपदकाची कमाई केली होती.

  • कुठे : सा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
  • कधी : रविवार, २६ मार्च
  • वेळ : संध्याकाळी ४.४५ वाजता.