* पॉन्टिंगच्या अखेरच्या सामन्यावर साऱ्यांचेच लक्ष

मालिकेतला अखेरचा सामना.. माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचाही अखेरचा सामना.. सामना जिंकल्यावर अव्वल क्रमांकाचा मिळणारा ताज.. या साऱ्या गोष्टींचा विचार करता पॉन्टिंगला विजयाने निरोप देऊन अव्वल क्रमांकाचा ताज पटकावण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला आहे. जगातील सर्वात वेगवान खेळपट्टी अशी ओळख असणाऱ्या वाकाच्या खेळपट्टीवर अखेरच्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ उतरेल तो विजयाची पताका फडकावण्यासाठीच, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिका विजयाचा झेंडा मिरवत मायदेशी जाण्यासाठी २००वा कसोटी सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ आतुर असेल.
आतापर्यंत अटीतटीच्या झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये निर्णय लागलेला नाही. दोन्ही सामने अनिर्णीत राहिलेले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानात मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी ही अखेरची संधी असेल. पॉन्टिंग अखेरच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, यावर साऱ्यांचेच लक्ष असेल. त्याचबरोबर शेन वॉटसनसारखा अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू असल्याने संघाचे पारडे किंचितसे जड असेल. कर्णधार मायकेल क्लार्क आणि माइक हसी चांगल्या फॉर्मात असून त्यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये मिचेल जॉन्सनचे संघात पुनरागमन झाल्याने गोलंदाजीला अधिक धार येईल.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात साऱ्यांचेच लक्ष डेल स्टेनवर असेल. आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली असून वेगवान खेळपट्टीवर त्याचा मारा फलंदाजांना निष्प्रभ करतो का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून संघासाठी तारणहार ठरलेल्या फॅफ डय़ू फ्लेसिसला बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जखमी झालेला महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस या सामन्यात खेळणार की नाही, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.